
सागर पार्कवरील क्रिकेट स्पर्धा बंदीच्या प्रस्तावाला विरोध
क्रिकेटप्रेमींची महापालिकेकडेमागणी; अटी-शर्तींसह स्पर्धांना परवानगी कायम ठेवण्याची विनंती
जळगाव : जळगाव महानगरपालिकेच्या मालकीच्या सागर पार्क मैदानावर आयोजित करण्यात येणाऱ्या क्रिकेट स्पर्धांवर बंदी घालण्याच्या प्रस्तावाला शहरातील क्रिकेटप्रेमी आणि माजी नगरसेवकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. येत्या १४ मे रोजी होणाऱ्या मनपा महासभेत हा ठराव रद्द करून पूर्वीप्रमाणे अटी-शर्तींसह क्रिकेट स्पर्धांना परवानगी कायम ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
महासभेत बंदीचा प्रस्ताव चर्चेत
मनपा महासभेत सागर पार्क मैदानावर क्रिकेट सामने व स्पर्धांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर शहरातील क्रिकेट खेळाडू, आयोजक आणि क्रीडाप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या संदर्भात विविध पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी निवेदनाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
खेळाडूंवर अन्याय होत असल्याचा आरोप
निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहरात महानगरपालिकेच्या मालकीचे सागर पार्क हेच एक प्रमुख मैदान असून गेल्या दहा-बारा वर्षांपासून येथे विविध सामाजिक, धार्मिक आणि क्रीडा संघटनांकडून डे-नाईट क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धांमुळे युवकांना व्यासपीठ मिळत असून सामाजिक ऐक्य आणि बंधुभावही वाढीस लागतो.
‘मैदान हडपण्याचा डाव’ असल्याची चर्चा
काही रहिवाशांच्या तक्रारींचे कारण पुढे करून हळूहळू मैदानावरील क्रीडा उपक्रम बंद करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. यापूर्वीही या मैदानावर व्यावसायिक प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र तो हाणून पाडण्यात आल्याची आठवण यावेळी करून देण्यात आली.
अटींसह परवानगी देण्याची मागणी
ध्वनीप्रदूषण आणि स्वच्छतेच्या तक्रारी लक्षात घेऊन आयोजकांनी ध्वनीक्षेपकाचा आवाज मर्यादित ठेवणे, सामन्यांची वेळ कमी करणे तसेच मैदान परिसराची नियमित साफसफाई करण्यास तयार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. रात्री दहा वाजेऐवजी सामने रात्री नऊपर्यंत मर्यादित ठेवण्याचाही प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
माजी नगरसेवकांची भूमिका
या मागणीसाठी माजी नगरसेवक अशोक एस. लाडवंजारी, सुनिल भैय्या माळी, राजुभाऊ मोरे, किरणभाऊ राजपूत, रिंकू चौधरी, सुहास चौधरी आणि नईम खाटीक यांनी एकत्र येत महासभेत क्रिकेट स्पर्धांवरील बंदीचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली आहे.




