धार्मिक

१६ ते २२ जून या कालावधीत गोव्यात ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे आयोजन !

भारताचे तुकडे होऊ द्यायचे नसतील, तर ‘हिंदु राष्ट्रा’शिवाय पर्याय नाही – प्रशांत जुवेकर

जळगाव  l ८ मे २०२३ l गोवा येथे गेल्या 11 वर्षांपासून होणार्‍या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’मुळे हिंदु राष्ट्राची चर्चा आता केवळ भारतातच नाही, तर वैश्विक पातळीवर प्रारंभ झाली आहे. यामध्ये आता हिंदु राष्ट्राची मागणी करणारी अनेक व्यासपिठे निर्माण झाली आहेत; मात्र दुसरीकडे देशात जिहादी आतंकवादच्या समर्थकांना मोठ्या प्रमाणात अटक होत आहे. पंजाबमध्ये खलिस्तानवादी पोलीस-प्रशासनाला आव्हान देत आहेत, हिंदू कार्यकर्त्यांच्या हत्या करत आहेत; तर मणिपूर, नागालँड यांसारख्या राज्यांतील हिंदूंची घरे जळत आहेत. काश्मीरमधून कलम 370 हटवले गेले, तरी तेथील हिंदू सुरक्षित झालेला नाही. देशभरात साक्षी, अनुराधा, श्रद्धा वालकर यांसारख्या असंख्य हिंदू मुलींच्या ‘लव्ह जिहादीं’कडून होणार्‍या निर्घृण हत्या पाहता देशातील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे, असे दिसते. ‘दी केरला स्टोरी’ या चित्रपटाने मांडलेले वास्तव केवळ ‘केरळ’ राज्यापुरते मर्यादित नसून या जिहादी षड्यंत्राची व्याप्ती देशभरात मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहे. एकीकडे हिंदूंनी भाषण केले की, लगेचच त्यांच्यावर ‘हेट स्पीच’चा गुन्हा दाखल केला जातो; मात्र ‘सर तन से जुदा’ करण्याच्या उघड घोषणा देणार्‍यांवर कारवाई होतांना दिसत नाही. दुसरीकडे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या तपासात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ आणि ‘आय.एस्.आय.एस्.’ हे भारताला वर्ष 2047 पर्यंत इस्लामी राष्ट्र बनवण्याचे षड्यंत्र रचत असल्याचे उघड झाले आहे. अशा स्थितीत हिंदु धर्म हा एकमात्र धर्म आहे की, जो समाजाला जोडू शकतो, तो विश्वबंधुत्वाची आणि ‘वसुधैव कुटुंबकम’ची संकल्पना मांडू शकतो. त्यामुळे भारताचे पुन्हा तुकडे होऊ द्यायचे नसतील, तर भारताला आदर्श रामराज्य अर्थात् हिंदु राष्ट्र बनवण्याशिवाय पर्याय नाही; म्हणूनच हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी प्रतीवर्षीप्रमाणे 16 ते 22 जून 2023 या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे एकादश ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ अर्थात् ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे, असे हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत हेमंत जुवेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पद्मालय रेस्ट हाऊस येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस सातपुडा निवासिनी मनुदेवी मंदिराचे सचिव प्रा. नीलकंठ चौधरी, सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव, अधिवक्ता योगेश पाटील हेही उपस्थित होते.

या वेळी सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव म्हणाले की, यंदाच्या अधिवेशनामध्ये ‘हिंदु राष्ट्र संसद’ या वैशिष्ट्यपूर्ण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. विविध विषयांवरील तज्ञ मंडळींचे परिसंवाद, तसेच विशेष कार्य करणार्‍या मान्यवरांच्या मुलाखती हेही यंदाच्या अधिवेशनाचे विशेष आकर्षण असणार आहे. ‘लव्ह जिहाद’, ‘हलाल सर्टीफिकेशन’, ‘लँड जिहाद’, ‘काशी-मथुरा मुक्ती’, ‘धर्मांतर’, ‘गोहत्या’, ‘गड-किल्ल्यांवरील इस्लामी अतिक्रमणे’, ‘मंदिर संस्कृतीचे रक्षण’, ‘काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन’, ‘पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंवरील अत्याचार’ यांसारख्या विविध विषयांसोबतच हिंदु राष्ट्राच्या पायाभरणीसाठी आवश्यक विषयांवर या महोत्सवामध्ये विचारमंथन होणार आहे.

हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर म्हणाले की, या अधिवेशनाला अमेरिका, इंग्लंड, इंडोनेशिया, सिंगापूर, बेल्जियम, बांग्लादेश आणि नेपाळ या देशांसह भारतातील 28 राज्यांतील 350 हून अधिक हिंदु संघटनांच्या 1500 हून अधिक प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने अमरावती येथील ‘श्री रुक्मिणी वल्लभ पिठा’चे अनंत विभूषित श्री जगद्गुरु रामानंदचार्य श्री स्वामी रामराजेश्वराचार्यजी सरकारजी, ‘विश्व हिंदु परिषदे’चे देवगिरी प्रांताचे संपर्कप्रमुख धर्माचार्य ह.भ.प. जनार्दन महाराज मेटे, ‘इंटरनॅशनल वेदांत सोसायटी’चे स्वामी निर्गुणानंदगिरी महाराज, त्रिपुरा येथील ‘शांती काली आश्रमा’चे स्वामी चित्तरंजन महाराज, छत्तीसगढ येथील ‘शदाणी दरबार’चे प.पू. डॉ. युधिष्ठिरलाल महाराज, छत्तीसगड येथील ‘श्री जामडी पाटेश्वरधाम सेवा संस्थान’चे संचालक श्रीरामबालकदास महात्यागी महाराज, गोंदिया येथील ‘महात्यागी सेवा संस्थान’चे अध्यक्ष पू. महंत श्रीरामज्ञानीदास महात्यागी महाराज आदी संतांची वंदनीय उपस्थितीही या अधिवेशनाला लाभणार आहे.

याशिवाय प्रामुख्याने काशी येथील ज्ञानवापी मशिदीच्या विरोधात न्यायालयीलन लढा देणारे अधिवक्ता (पू.) हरिशंकर जैन आणि त्यांचे सुपुत्र ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टीस’चे राष्ट्रीय प्रवक्ते अधिवक्ता विष्णु शंकर जैन, तेलंगाणा येथील हिंदुत्वनिष्ट आमदार टी. राजासिंह, माजी आमदार तथा ‘हिंदु इकोसिस्टिम’चे संस्थापक श्री. कपिल मिश्रा यांच्यासह वरीष्ठ अधिवक्ता, उद्योजक, विचारवंत, लेखक, मंदिर विश्वस्त, तसेच अनेक समविचारी सामाजिक, राष्ट्रीय आणि आध्यात्मिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत. तसेच आपल्या जिल्ह्यातील महाराष्ट्र आणि गोवा बार काऊन्सिलचे माजी चेअरमन ज्येष्ठ विधिज्ञ भरत देशमुख, विधिज्ञ प्रवीणचंद्र जंगले, अमळनेर येथील सुप्रसिद्ध श्री मंगळग्रह मंदिराचे अध्यक्ष श्री. डीगंबर महाले, हिंदु राष्ट्र सेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री. मोहन तिवारी हेही या महोत्सवाला उपस्थित रहाणार आहेत.

सातपुडा निवासिनी मनुदेवी मंदिराचे सचिव प्रा. नीलकंठ चौधरी म्हणाले की, मागील वर्षीच्या राष्ट्रीय अधिवेशनात ‘मंदिर सुव्यवस्थापन’ या विषयावर झालेल्या दिशादर्शनामुळे या वर्षी जळगाव येथे राज्यस्तरीय मंदिर न्यास परिषद होऊ शकली आणि त्यातून महाराष्ट्र मंदिर महासंघ कायान्वित झाला. आज या मंदिर महासंघामुळे राज्यभरात मंदिरांचे उत्तम संघटन होतांना दिसून येत आहे. महासंघाने केलेल्या आवाहनामुळे आज राज्यभरात १०० हून अधिक मंदिरात आज वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. या वर्षीच्या महोत्सवात ‘मंदिर संस्कृती रक्षा’ या विषयावर पुढील नियोजनाच्या दृष्टीने व्यापक मंथन होणार आहे आणि त्यासाठी या वर्षी अनेक मंदिर विश्वस्त या महोत्सवात सहभागी होणार आहेत.

या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ HinduJagruti.org याद्वारे, तसेच समितीच्या ‘HinduJagruti’ या ‘यु-ट्यूब’ चॅनेल आणि facebook.com/hjshindi1 या फेसबुक द्वारेही केले जाणार आहे. जगभरातील हिंदुत्वनिष्ठांनी या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चा लाभ घ्यावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button