
जळगावातील नागरी प्रश्नांवर राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक; मनपासमोर आंदोलन
पाणी, रस्ते, पथदिवे आणि स्वच्छतेच्या प्रश्नांवर प्रशासनाचा निषेध; १५ दिवसांत समस्या न सुटल्यास मनपाला कुलूप ठोकण्याचा इशारा
जळगाव | प्रतिनिधी :
शहरातील प्रलंबित नागरी प्रश्नांकडे जळगाव महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महानगर शाखेने गुरुवारी (२० ऑगस्ट) महापालिका कार्यालयासमोर आंदोलन केले. पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनपाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या देत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. सुमारे दोन तास चाललेल्या या आंदोलनानंतर आयुक्त व महापौरांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
अनियमित पाणीपुरवठ्यावरून प्रशासनाला धारेवर
शहरातील अनेक भागांमध्ये नियमित तसेच पुरेशा दाबाने पाणी मिळत नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना पूर्वकल्पना न देता पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल केला जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
पाणीपुरवठा सुरळीत करण्याआधी वॉटर मीटर बसवून पाणीपट्टी आकारण्याची प्रक्रिया राबवू नये. नागरिकांना नियमित पाणी मिळत असल्याची खात्री झाल्यानंतरच वॉटर मीटरबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी पक्षाने केली.
खड्डेमय रस्ते आणि बंद पथदिव्यांचा मुद्दा
पावसाळ्यात शहरातील रस्त्यांची अवस्था अधिकच खराब झाली असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. कामासाठी मंजुरी मिळूनही प्रत्यक्षात काम न करणाऱ्या मक्तेदारांवर कारवाई करून नवीन मक्तेदारांमार्फत रस्त्यांची दुरुस्ती तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी करण्यात आली.
यासोबतच शहरातील बंद पथदिवे कार्यान्वित करावेत. अजिंठा चौफुलीपासून विमानतळापर्यंत बसविण्यात येणाऱ्या सौर पथदिव्यांचे रखडलेले काम पूर्ण करून ते सुरू करावेत, अशी मागणीही करण्यात आली.
कचऱ्यामुळे आरोग्याचा धोका
शहरातील विविध भागांमध्ये कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कचऱ्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने नियमित स्वच्छता करावी आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
शहरातील मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली. शिवाजीनगर उड्डाणपुलावरील खड्डे बुजवून पुलाची दुरुस्ती करावी, तसेच पुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.गेल्या काही वर्षांपासून रखडलेला पुलावरील लोखंडी जिन्याचा प्रश्न मार्गी लावावा, तसेच मेहरुण शिवारातील उद्यान परिसरातील स्मशानभूमीत आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली.
मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
महापालिका प्रशासनाने शहरातील नागरी प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. पुढील १५ दिवसांत मागण्यांची पूर्तता न झाल्यास मनपा कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकून आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा महानगर जिल्हाध्यक्ष अशोक एस. लाडवंजारी यांनी दिला.
या आंदोलनात कार्याध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस वाय. एस. महाजन, प्रदेश चिटणीस प्रतिभाताई शिरसाट, विकासदादा पवार, युवक महानगर जिल्हाध्यक्ष विनायक पाटील, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मजहरभाई पठाण, जिल्हा उपाध्यक्ष किरणभाऊ राजपूत, माजी नगरसेवक राजुभाऊ मोरे, सुनील भैय्या माळी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





