

ईद-ए-मिलाद निमित्त रक्तदान व नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
युवकांचा मोठा सहभाग; मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मे वाटपाचा नागरिकांनी घेतला लाभ
जळगाव | प्रतिनिधी : ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त स्व. अब्दुल गफ्फार मलिक फाउंडेशनतर्फे २६ ऑगस्ट रोजी अब्दुल हमीद चौक, शामा फायर, ताबापूर येथे रक्तदान व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिरात मोठ्या संख्येने युवकांनी रक्तदान केले. तसेच नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि मोफत चष्मे वाटपाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. अनेक नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
रक्त संकलनाचे कार्य सिव्हिल हॉस्पिटल ब्लड बँक आणि रेड प्लस ब्लड बँकेच्या सहकार्याने करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून रक्तदानासोबतच गरजू नागरिकांना नेत्रविषयक उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी माजी उपमहापौर सदाशिव ढेकळे, माजी उपमहापौर अब्दुल करीम सालार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव एजाज अब्दुल गफ्फार मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे शहर कार्याध्यक्ष नदीम अब्दुल गफ्फार मलिक, मजीद जकरिया, कादर कच्ची, आसिफ शेख, इमरान बागवान, तौसीफ, खलील चाचा, तनवीर भासा, अलीम मिस्त्री, अज्जू भाई, आसिफ शाह बापू, अजीज बाबा आदी मान्यवर उपस्थित होते.
ईद-ए-मिलादच्या निमित्ताने धार्मिक उत्सवासोबतच सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम राबविण्यात आल्याने उपस्थितांनी फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले.




