खान्देशगुन्हेजळगांव

ज्यूसच्या बहाण्याने मोटरसायकल लंपास; सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी जेरबंद

ज्यूसच्या बहाण्याने मोटरसायकल लंपास; सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी जेरबंद
अमळनेर (प्रतिनिधी)ज्यूस प्यायचा बहाणा करून स्टेट बँकेसमोर उभी असलेली मोटरसायकल चोरून नेल्याची घटना ५ तारखेला रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी अमळनेर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निलेश हिम्मत संदानशीव यांनी आपली मोटरसायकल (क्र. एमएच १९ बीएल ६८७५) स्टेट बँकेसमोर असलेल्या ज्यूसच्या दुकानाजवळ उभी केली होती. त्यावेळी ज्यूस विक्रेत्याने “घरून चार्जिंग लाईट घेऊन येतो” असे सांगून मोटरसायकलची चावी घेतली. चावी लावून मोटरसायकल सुरू करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच एक अनोळखी व्यक्ती तेथे आली आणि ज्यूस मागितला.

ज्यूस बनविण्यात व्यस्त असताना मोटरसायकलची चावी तशीच राहिली. काही वेळाने संदानशीव परत आल्यानंतर मोटरसायकल जागेवर नसल्याचे लक्षात आले. संबंधित अनोळखी इसमाने संधी साधून मोटरसायकल चोरून नेल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे संशयिताचा माग काढला. तपासात सैय्यद ओम याकूब सैय्यद रेहमान (रा. चोपडा, सध्या मुक्काम गंधलीपुरा) याने ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले.

हेड कॉन्स्टेबल सुनील तेली, सूर्यकांत साळुंखे, प्रशांत पाटील, उज्वल म्हस्के, अमोल कर्डयीकर, राजेंद्र देशमाने व मयूर पाटील यांच्या पथकाने आरोपीला मोटरसायकलसह ताब्यात घेतले.

दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button