
बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या विक्रेत्यांवर कारवाई
२० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त ; चौघांना २० हजारांचा केला दंड
जळगाव I प्रतिनिधी
राज्यामध्ये बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या सर्रासपणे शहरात विक्री होत असल्याने महापालिकेच्या पथकाने मंगळवारी बंदी असलेल्या प्लास्टिकच्या २० किलो वजनाच्या कॅरीबॅग जप्त करून चार विक्रेत्यांना २० हजारांचा दंड केला.
या कारवाईमध्ये भास्कर मार्केटमधील गायत्री प्रोव्हिजन येथून १३ किलो, रेल्वे स्टेशन परिसरातील जगदीश रायसिंगानी यांच्याकडून २ किलो, कासमावाडीतील सुयश प्रोव्हीजन व गंगाराम एकनाथ चौधरी यांच्याकडून पाच किलो प्लास्टीक जप्त करण्यात आले.
सहाय्यक आयुक्त उदय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य स्वच्छता निरीक्षक जितेंद्र किरंगे, नागेश लोखंडे, रमेश कांबळे, आरोग्य निरीक्षक रुपेश भालेराव, मंजू पवार, मनोज पाटील, सुरेश भालेराव, मुकादम भीमराव सपकाळे, नितीन जावळे व रवी सनकत यांनी ही कारवाई केली.