
१३ वर्षीय मुलाचा उष्माघाताने मृत्यू
भडगाव शहरातील घटना
भडगाव, ;- जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या तीव्र उष्णतेचा गंभीर परिणाम भडगावमधील एका निष्पाप बालकावर झाला आहे. आझाद चौकात राहणाऱ्या दीपक किसन पवार (पांचाळ) यांचा १३ वर्षीय चिरंजीव दिनेश याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.
दिनेश (वय १३) सु.गि.पाटील विद्यालय, भडगाव येथील इयत्ता सातवीचा विद्यार्थी होता. दिनांक २१ एप्रिल रोजी तो खेळत असताना अचानक त्याची प्रकृती बिघडली. उलटी आणि जुलाब सुरू झाल्याने त्याला तात्काळ भडगाव येथे उपचारासाठी नेण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी जळगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. सायंकाळी उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मावळली.
उपस्थित डॉक्टरांनी उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, २२ एप्रिल रोजी जळगाव येथे शवविच्छेदन करण्यात आले आणि दुपारी १ वाजता भडगाव येथे शोकमय वातावरणात दिनेशवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पवार कुटुंब अत्यंत गरिबीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे. दीपक पवार हे परंपरागत पांचाळ व्यवसाय करत असून, दिनेश हा घरातला अत्यंत हुशार, हजरजबाबी आणि पुढे जाऊन अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणारा मुलगा होता. त्याच्या अकाली जाण्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दिनेशच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण, काका, काकू आणि आजी असा मोठा परिवार आहे. कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला असून, समाजातून शोकसंवेदना व्यक्त होत आहेत.