
औरंगाबाद खंडपीठाकडून दोन आरोपींना अंतरिम जामीन मंजूर, आठ वर्षांची शिक्षा केली निलंबित
औरंगाबाद धुळे जिल्ह्यातील वरशी येथील दोन आरोपींना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती अभय वाघवसे यांनी दिलेल्या आदेशानुसार, आरोपी अरुण उर्फ मुकेश श्याम सोनवणे (२८) व विशाल सहेबराव सोनवणे (२५) यांची ८ वर्षांची शिक्षा तात्पुरती निलंबित करण्यात आली आहे.
या प्रकरणात दोघांनाही भारतीय दंड संहिता कलम ३०४(२) व ३२३ अंतर्गत दोषी ठरवण्यात आले होते. सत्र न्यायालय, धुळे यांनी २७ जून २०२४ रोजी शिक्षा सुनावली होती.
जामीन मंजुरीमागील न्यायालयीन निरीक्षण
आरोपींच्या वतीने अॅड. जितेंद्र पाटील यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, हा प्रकार क्षणिक रागाच्या भरात घडला होता. फक्त लाथाबुक्क्यांचा वापर झाला असून मृत्यू डोक्याला लागलेल्या इजेमुळे झाला. एक आरोपी तीन वर्षे आणि दुसरा सात महिने तुरुंगात राहिला आहे.
कोर्टाने आरोपींना १५,००० रुपयांच्या वैयक्तिक हमीपत्रासह दोन जामीनदारांच्या हमीवर जामीन मंजूर केला असून, त्यांना प्रत्येक सहा महिन्यांनी ट्रायल कोर्टात हजेरी लावणे बंधनकारक असेल. अन्यथा, जामीन रद्द केला जाऊ शकतो, असा इशाराही न्यायालयाने दिला आहे.
या प्रकरणात अॅड. जितेंद्र पाटील यांनी बाजू मांडली. त्यांना अॅड. खुशाल जाधव, मोहनिष संदनशिव, जितेश थोरात, मोहम्मद कैफ, चंदन पाटील व अक्षय यांनी सहकार्य केले.