जळगाव शहरात वाहतूक सिग्नल बंद; अजिंठा चौफुलीवर गोंधळ, अपघाताचा धोका वाढला

जळगाव शहरात वाहतूक सिग्नल बंद; अजिंठा चौफुलीवर गोंधळ, अपघाताचा धोका वाढला
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील वाहतूक व्यवस्थेचा दिवसेंदिवस गोंधळ वाढत असून, नागरिकांकडून वाहतूक नियमांकडे सर्रासपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा कार्यान्वित असली तरी, अनेक ठिकाणी ती बंद अवस्थेत दिसत आहे, ज्यामुळे अपघातांची शक्यता वाढत आहे.
मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अजिंठा चौफुली येथे झालेल्या पाहणीत एक धक्कादायक बाब उघडकीस आली. चौकात सिग्नलचा पोल असूनही यंत्रणा बंद होती. एवढ्या मोठ्या आणि वाहतूक गर्दीच्या चौकात केवळ एक पोलीस कर्मचारी वाहतूक नियंत्रित करताना दिसला. वाहनांची संख्या पाहता एका कर्मचाऱ्याला सर्व दिशांमधील वाहतूक सुरळीत ठेवणे अत्यंत कठीण काम होते.
या काळात अनेक वाहनचालकांनी सिग्नल बंद असल्याचा फायदा घेत वाहतूक नियम मोडले. काही दुचाकीस्वार तर थेट उलट दिशेने वाहन चालवत होते, जे अत्यंत धोकादायक आहे.
या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होतात –
शहरातील सिग्नल यंत्रणा बंद का आहे? आणि सुरू असलेल्या सिग्नलचे नागरिक पालन का करत नाहीत?
वाहतूक शाखा आणि पोलीस प्रशासन या प्रश्नांकडे किती गांभीर्याने पाहत आहेत, हे लक्षात घेण्याची गरज आहे.
वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केल्याशिवाय शिस्त येणार नाही, असे अनेक नागरिक व्यक्त करत आहेत. तसेच, शहरातील सर्व सिग्नल कार्यान्वित करून त्यांचे नियमित देखभाल व दुरुस्ती, तसेच पुरेशा संख्येने वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.
वाहतूक शाखेने तत्काळ लक्ष देत योग्य उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.