
यावलमधील जबरी चोरीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
तीन सराईत आरोपी जेरबंद, १३ लाखांची रक्कम हस्तगत; कुख्यात गुन्हेगार साहील शहा फरार
जळगाव (प्रतिनिधी) : यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या जबरी चोरीच्या गंभीर गुन्ह्याचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने मोठे यश मिळविले आहे. या कारवाईत तीन सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून, गुन्ह्यात चोरीस गेलेली तब्बल १३ लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. मात्र, या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार व धुळे येथील कुख्यात गुन्हेगार साहील सत्तार शहा आणि त्याचा एक साथीदार अद्याप फरार असून, त्यांचा कसून शोध सुरू आहे.
यावल पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४७९/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९ (४) – जबरी चोरी, ३५१ (३) – गुन्हेगारी धमकी व १२६ (२) – अटकाव अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक जळगाव यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेची चार विशेष पथके तयार करून भुसावळ, यावल, चोपडा व जळगाव शहरात रवाना करण्यात आली. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण, पूर्वीच्या गुन्हेगारी नोंदी तसेच गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा चोपडा व जळगाव येथील पाच आरोपींनी केल्याचे स्पष्ट झाले. ही माहिती पोलीस हवालदार विलेश सोनवणे यांना मिळाल्यानंतर सापळा रचत तीन आरोपींना शिताफीने अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेले आरोपी
जुबेर खान हमीद खान (वय ३३, रा. चोपडा)
शोएब शेख इस्माईल शेख (वय २५, रा. हुडको, जळगाव)
ईस्माईल खान शेर खान (वय २५, रा. हुडको, जळगाव)
सखोल चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, हा गुन्हा त्यांनी साहील सत्तार शहा (रा. धुळे) व अनस शहा (रा. जळगाव) यांच्यासोबत संगनमत करून केल्याचे निष्पन्न झाले आहे. अटक केलेल्या आरोपींकडून त्यांच्या वाट्याला आलेली १३ लाख रुपयांची चोरीची रक्कम जप्त करण्यात आली आहे.
दरम्यान, फरार आरोपी साहील सत्तार शहा हा धुळे शहरातील आझादनगर पोलीस ठाणे हद्दीतील सराईत व अट्टल गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध घरफोडी, चोरी, वाहन चोरी, मंदिर चोरी तसेच अंमली पदार्थ कायद्यान्वये एकूण सहा गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्या अटकेसाठी स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली असून, लवकरच त्याला जेरबंद करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर (फैजपूर उपविभाग) यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
तपास पथकात सोपान गोरे, जितेंद्र वल्टे, शेखर डोमाळे, विलेश सोनवणे, प्रितमकुमार पाटील, पशवंत टहाकळे, अक्रम शेख, सलीम तडवी, छगन तायडे, बबन पाटील, मयूर निकम, राहुल रगडे, प्रदीप सपकाळे, ईश्वर पाटील, गौरव पाटील, मिलिंद जाधव यांच्यासह भुसावळ व जळगाव उपविभागातील अधिकारी-अंमलदार, तसेच चापोहेका दर्शन ढाकणे व महेश सोमवंशी यांचा समावेश होता.





