
सै.नियाज अली भैय्या फाउंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेबांना अभिवादन; विविध उपक्रमांची सुरुवात
जळगाव : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमांची सुरुवात रविवारी (दि. १२ एप्रिल) उत्साहात करण्यात आली. हे कार्यक्रम १४ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सकाळी १० वाजता रेल्वे स्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे फाउंडेशनच्या सदस्यांनी एकत्र येत पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले तसेच संविधान, देश आणि देशवासीयांप्रती निष्ठा राखण्याची शपथ घेण्यात आली.
यावेळी सै. अयाज अली नियाज अली यांनी मनोगत व्यक्त करताना संविधानाने दिलेले हक्क व अधिकार जसे महत्त्वाचे आहेत, तसेच प्रत्येकाने आपली कर्तव्येही जबाबदारीने पार पाडली पाहिजेत, असे सांगितले. देशाची एकता, अखंडता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी सजग राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो”, “भारतीय संविधानाचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
या वेळी हाजी शकुर बादशाह, शेख शफी, इलियास नुरी, आसिफ रब्बानी, शेख रईस, युनूस अझीझ, शेख नझीरउद्दीन, शेख रहेमान, अन्सार खान, झुबेर रंगरेज, अश्फाक बशीर, शेख नूर मोहम्मद, सलमान खान, शेख इनायत, फिरोज खान, शेख शाहिद, मुश्ताक अब्बास, जावेद खान, शेख रागिब यांच्यासह फाउंडेशनचे अनेक सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. दरम्यान, १४ एप्रिलपर्यंत विविध सामाजिक व जागरूकता उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.





