
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हे रस्ते राहतील बंद
जिल्ह्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी कडेकोट बंदोबस्त
२१०० होमगार्ड, एसआरपीएफचे पथक तैनात; ४६० हून अधिक मिरवणुकांची तयारी
जळगाव : प्रतिनिधी — भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी जिल्हाभरात उत्साहात आणि शांततेत कार्यक्रम पार पडावेत यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाने कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. विविध राजकीय व सामाजिक संघटनांकडून मोठ्या प्रमाणावर मिरवणुका आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याने पोलीस प्रशासनाने विशेष सुरक्षा आराखडा तयार केला आहे.
या बंदोबस्तासाठी जिल्ह्यात २१०० होमगार्ड, एसआरपीएफचे २ प्लाटून, १४ स्ट्रायकिंग फोर्स आणि ८ आरसीपी पथके तैनात करण्यात आली आहेत. जिल्ह्यात १७२ ठिकाणी पुतळा पूजन, ४९६ ठिकाणी प्रतिमा पूजन, तसेच ६ ठिकाणी मोटारसायकल रॅली आयोजित करण्यात येणार असून, एकूण ४६० हून अधिक मिरवणुका काढल्या जाणार आहेत.
जयंती शांततेत पार पडावी यासाठी सर्व पोलीस ठाण्यांच्या वतीने शांतता समिती आणि मोहल्ला समित्यांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. शहरातील शनिपेठ, टॉवर चौक, चित्रा चौक आणि रेल्वे स्टेशन या मार्गांवरून प्रमुख मिरवणुका निघणार असल्याने दुपारी ४ वाजल्यापासून मिरवणुका संपेपर्यंत वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
चोपडा, कानळदा आणि विदगावकडून येणाऱ्या एसटी बस, अवजड वाहने व इतर वाहनांसाठी शिवाजीनगर, दूध फेडरेशन, उत्तुंग कॉर्नर, गुजराल पेट्रोल पंप, शिवकॉलनी आणि आकाशवाणी चौक मार्गे पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. तसेच आसोदा-भादलीकडून येणारी वाहने मोहन टॉकीज, गजानन मालुसरे नगर, लक्ष्मी नगर, कालींका माता, अजिंठा चौक मार्गे वळविण्यात आली आहेत.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणतेही आक्षेपार्ह देखावे सादर करू नयेत तसेच कोणत्याही धर्म किंवा समाजाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संपूर्ण पोलीस दल सज्ज असून सर्व यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.




