खान्देशगुन्हेजळगांव

जळगाव एलसीबीचा मोठा ‘धडाका’; गॅस सिलेंडर चोरणारी टोळी जेरबंद

जळगाव एलसीबीचा मोठा ‘धडाका’; गॅस सिलेंडर चोरणारी टोळी जेरबंद

फैजपूर–वरणगावातील दोन मोठे गुन्हे उघड; ४.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव | प्रतिनिधी – जिल्ह्यात गॅस एजन्सींच्या गोदामांना लक्ष्य करत सिलेंडर चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन सराईत आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून चोरी केलेले १५७ गॅस सिलेंडर आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ४ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात गॅस सिलेंडर चोरीच्या घटनांनी डोके वर काढले होते. २५ एप्रिल २०२६ रोजी फैजपूर येथील श्रीधर गॅस एजन्सीच्या गोदामातून अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून ३ लाख १९ हजार ८०० रुपये किमतीचे १०० सिलेंडर लंपास केले होते. त्यानंतर २६ फेब्रुवारी २०२६ रोजी वरणगाव येथील भारत गॅस एजन्सीच्या गोदामातून ७२ हजार ८४६ रुपये किमतीचे ५७ सिलेंडर चोरीला गेले होते. या घटनांमुळे एजन्सी चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार करण्यात आली. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित वाहनांचा मागोवा घेत पोलिसांनी कासोदा, तांबापुरा आणि नशिराबाद परिसरातून तीन संशयितांना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शेख बिलाल शेख नवी (३२, रा. कासोदा), वसीम खान शाबीर खान (३१, रा. तांबापुरा) आणि चेतन सुरेश काळे (३८, रा. नशिराबाद) यांचा समावेश आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने फैजपूर आणि वरणगाव येथील दोन्ही चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपींकडून भारत गॅस कंपनीचे ६२ भरलेले व ९५ रिकामे सिलेंडर तसेच गुन्ह्यात वापरलेली सुझुकी मोपेड (MH 19 ELL 8871) जप्त केली आहे. या कारवाईत एकूण ४,२७,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर आणि केदार वारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह उपनिरीक्षक सोपान गोरे, प्रितम पाटील, प्रेमचंद सपकाळे, सलीम तडवी, उमाकांत पाटील, यशवंत टहाकळे, श्रीकृष्ण देशमुख, बबन पाटील, सचिन पुगे, प्रदीप सपकाळे, मयूर निकम, गौरव पाटील आणि मिलिंद जाधव यांचा समावेश होता.

अटक आरोपींना पुढील तपासासाठी फैजपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सैय्यद आणि विनोद गाभणे अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button