खान्देशगुन्हेजळगांव

जळगावात आज ‘राष्ट्रीय लोक अदालत’; प्रलंबित खटले तडजोडीने निकाली काढण्याची संधी

जळगावात आज ‘राष्ट्रीय लोक अदालत’; प्रलंबित खटले तडजोडीने निकाली काढण्याची संधी
​जळगाव: वर्षानुवर्षे विविध कारणांनी प्रलंबित राहणारे खटले, त्यातून होणारा आर्थिक खर्च आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार आज, शनिवार दि. ९ मे २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यात ‘राष्ट्रीय लोक अदालत’ आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात होणाऱ्या या उपक्रमात शेकडो खटले सामोपचाराने निकाली काढले जाणार असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने दिली आहे.
​जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या लोक अदालतीचे अध्यक्षपद प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. जोशी भूषविणार आहेत. या मोहिमेला जिल्हा प्रशासन, पोलीस दल, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका प्रशासनाचे विशेष सहकार्य लाभणार आहे. लोक अदालतीमध्ये प्रामुख्याने मोटार वाहन ट्रॅफिक चलन, भूसंपादन, धनादेश अनादर (चेक बाऊन्स), वैवाहिक वाद, मोटार अपघात दावे, दिवाणी व फौजदारी अशा विविध तडजोडयोग्य प्रकरणांवर सुनावणी होणार आहे.
​थकीत रकमेत मिळणार सवलत
या लोक अदालतीचे वैशिष्ट्य म्हणजे न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांसोबतच ‘दाखलपूर्व’ (Pre-litigation) प्रकरणांवरही सुनावणी होणार आहे. राष्ट्रीयकृत बँका, वित्तीय कंपन्या, भ्रमणध्वनी कंपन्या आणि दूरसंचार कार्यालयांनी त्यांच्या थकीत देयकांमध्ये विशेष सवलत देण्याचे प्रस्तावित केले आहे. यामुळे नागरिकांना कमी खर्चात आणि सन्मानपूर्वक आपले जुने वाद मिटवता येणार आहेत.
​ज्या पक्षकारांना आपली प्रकरणे सामोपचाराने निकाली काढायची आहेत, त्यांनी आपल्या वकिलांसह या लोक अदालतीत उपस्थित राहावे. ऐनवेळी देखील तडजोडीसाठी खटले ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button