
जळगाव बाजार समितीच्या सभापतीपदाचा सस्पेन्स संपला; ‘लकी टेलर’ यांची बिनविरोध निवड !
राजकीय पेचावर अखेर पडदा ; समर्थकांमध्ये जल्लोष
जळगाव: गेल्या काही दिवसांपासून जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदावरून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना अखेर सोमवारी पूर्णविराम मिळाला आहे. बाजार समितीच्या सभापतीपदी लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ लकी टेलर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे बाजार समितीतील गेल्या काही दिवसांपासूनचा राजकीय पेच संपुष्टात आला असून समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
सोमवारी सकाळी ११ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य सभागृहात सभापती निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. पीठासीन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या निवड प्रक्रियेत लकी टेलर यांच्या वतीने एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. मुदतीत दुसरा कोणताही अर्ज न आल्याने पीठासीन अधिकाऱ्यांनी लकी टेलर यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली. या महत्त्वपूर्ण निवडीच्या वेळी आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार, माजी सभापती सुनील महाजन यांच्यासह बाजार समितीचे संचालक आणि सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी बाजार समितीच्या १२ संचालकांनी तत्कालीन सभापती सुनील महाजन यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. या राजकीय घडामोडीनंतर सुनील महाजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रिक्त झालेल्या सभापतीपदासाठी विविध नावांची चर्चा सुरू होती. अखेर लकी टेलर यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब झाल्याने बाजार समितीच्या राजकारणातील सस्पेन्स संपला आहे. नवीन सभापतींच्या निवडीनंतर आता बाजार समितीच्या पुढील कारभाराला आणि शेतकरी हिताच्या कामांना गती मिळणार असल्याची चर्चा सहकार वर्तुळात सुरू आहे.




