
‘भंगाळे गोल्ड’कडून मनपा नियमांचे उल्लंघन; ॲड. पियुष पाटील यांचा आरोप
दुभाजकांवरील जाहिरातींमध्ये नियमांचा फज्जा
भंगाळे गोल्ड’वर कठोर कारवाई करा ; करार रद्द करण्याची ॲड. पियुष पाटील यांची मागणी
जळगाव प्रतिनिधी शहर महानगरपालिकेतर्फे शहरातील विविध प्रमुख रस्त्यांवरील दुभाजकांचे सुशोभीकरण व देखभाल करण्यासाठी विविध सामाजिक संस्था तसेच व्यावसायिकांना परवानगी देण्यात आलेली आहे.या योजनेअंतर्गत संबंधित संस्था किंवा व्यावसायिकांनी दुभाजकांची दुरुस्ती करणे, रंगरंगोटी करणे, झाडे – फुलझाडे लावणे, परिसर स्वच्छ ठेवणे तसेच वेळोवेळी देखभाल करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
महानगरपालिकेने केलेल्या करारानुसार संबंधित जाहिरात फलकांमध्ये ४० टक्के जागा महानगरपालिकेच्या नावासाठी आणि ६० टक्के जागा संबंधित व्यावसायिकांच्या जाहिरातीसाठी राखीव ठेवणे आवश्यक आहे.तसेच प्रत्येक जाहिरात फलकामध्ये किमान १० मीटर (३२.५ फूट) अंतर ठेवणे हा देखील स्पष्ट नियम आहे.
मात्र स्वातंत्र्य चौक ते नंदिनीबाई बेंडाळे शाळा या मार्गावरील दुभाजकांवर भंगाळे गोल्ड व्यवस्थापनाकडून या नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.संबंधित ठिकाणी लावण्यात आलेल्या फलकांवर १०० टक्के स्वतःच्या व्यवसायाची जाहिरात करण्यात आली असून, त्यामध्ये महानगरपालिकेचा कुठेही उल्लेख आढळून येत नाही. याशिवाय जाहिरात फलकांमधील आवश्यक १० मीटर अंतराचा नियम देखील पाळण्यात आलेला नाही.
भंगाळे गोल्डकडून यापूर्वीही जळगाव शहरात अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणावर जाहिरात होर्डिंग्ज लावण्यात आल्याच्या तक्रारी झालेल्या आहेत. या प्रकरणात महानगरपालिकेकडून वेळोवेळी दंडात्मक कारवाईही करण्यात आल्याचे समोर आले आहे. तरीदेखील नियमभंग सुरूच असल्याने संबंधित करार तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांनी केली आहे.
तसेच, सर्वसामान्य नागरिकांवर अतिक्रमण विभागाकडून ज्या पद्धतीने कठोर कारवाई केली जाते, त्याचप्रमाणे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या भंगाळे गोल्डवरही समान आणि कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. याबाबत पर्यावरण विभाग अभियंता, यांच्यासह जळगाव शहर महानगरपालिकेचे महापौर, आयुक्त, आयुक्त यांच्याकडे लेखी स्वरूपाची तक्रार करण्यात आलेली आहे.
भंगाळे गोल्ड व्यवस्थापकांचे पुतणे हे जळगाव शहर महानगरपालिकेत सत्ताधारी गटाचे विद्यमान नगरसेवक असून माजी महापौर देखील आहेत यामुळे ते प्रशासनावर दबाव तंत्राचा वापर करीत असतात व पदाचा दुरुपयोग करीत असतात असे ॲड.पाटील यांनी म्हटले आहे.
एकीकडे लहान व्यवसायिकांवर कार्यवाही करणारे मनपा प्रशासन आता धनदांड्यांवर काय कारवाई करते याकडे लक्ष लागून आहे.





