
जळगावात महापौरांची प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; दुकानांवर दंडात्मक कारवाई
बाजारपेठेत उडाली खळबळ; सराईत विक्रेत्यांना दुकान सील करण्याचा इशारा
जळगाव: प्रतिनिधी शहरात पुन्हा वाढत असलेल्या प्रतिबंधित प्लास्टिकच्या वापराविरोधात जळगाव महानगरपालिकेने मंगळवारी सायंकाळी मोठी धडक कारवाई केली. महापौर दीपमाला काळे यांच्या नेतृत्वाखाली मध्यवर्ती बाजारपेठेत अचानक तपासणी मोहीम राबविण्यात आल्याने व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. या कारवाईदरम्यान अनेक दुकानांमधून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत.
शहरात पुन्हा सर्रास प्लास्टिक वापर सुरू झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर महापौरांनी ही गंभीर दखल घेतली. मंगळवारी सायंकाळी ५ वाजता राजकमल टॉकीज परिसर, तिजोरी गल्ली, अशोक टॉकीज गल्ली, दाणा बाजार, नेताजी सुभाषचंद्र चौक आणि फुले मार्केट परिसरात अचानक तपासणी करण्यात आली. महापौर स्वतः पायी फिरून तपासणी करत असल्याचे पाहताच फळ-भाजी विक्रेते, हातगाडी चालक आणि दुकानदारांची धावपळ उडाली.
तपासणीदरम्यान महापालिकेच्या आरोग्य विभागाने जागेवरच प्लास्टिक जप्त करत नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. यापूर्वीही दोन वेळा कारवाई होऊनही पुन्हा प्लास्टिक आढळल्याने ‘जवाहर क्लोथ स्टोअर्स’ आणि ‘एच. आर. ट्रेडर्स’ या दुकानांवर प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. “यापुढे प्रतिबंधित प्लास्टिक आढळल्यास संबंधित दुकान थेट सील केले जाईल,” असा कडक इशारा महापौरांनी यावेळी दिला.
दरम्यान, काही जागरूक व्यापाऱ्यांकडे पर्यावरणपूरक बायोडिग्रेडेबल आणि शासनमान्य पिशव्या आढळून आल्याने त्यांचे कौतुकही करण्यात आले. या कारवाईत नगरसेवक रमेश मतानी, मुख्य स्वच्छता निरीक्षक मुकेश पाटील, रुपेश भालेराव यांच्यासह महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.





