
जळगाव जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट ; विषारी दारू मटका गुटखा कायमचा बंद करा
शैलेंद्र सपकाळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
जळगाव | प्रतिनिधी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते शैलेंद्र काशिनाथ सपकाळे यांनी जळगाव जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांना निवेदन सादर करून जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध विषारी दारू, हातभट्टी, गुटखा, मटका, जुगार, अमली पदार्थ आणि इतर अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सदर निवेदनात जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी रासायनिक मिश्रित व विषारी हातभट्टी दारूची खुलेआम विक्री होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. अशा दारूमुळे अनेक गरीब कुटुंबे उद्ध्वस्त होत असून अनेक कुटुंबातील कर्ते पुरुष व्यसनाधीन होऊन मृत्यूमुखी पडत असल्याचे शैलेंद्र सपकाळे यांनी नमूद केले आहे.
युवक व्यसनाधीनतेकडे; सामाजिक अस्थिरतेची भीती
गुटखा, मटका, जुगार आणि अमली पदार्थांच्या वाढत्या अवैध धंद्यांमुळे जिल्ह्यातील युवक व्यसनाधीन होत असल्याची चिंता निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. या अवैध व्यवसायांमुळे चोरी, मारामाऱ्या, महिलांवरील अत्याचार तसेच सामाजिक अस्थिरतेच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाया होत असल्या तरी या अवैध धंद्यांवर कायमस्वरूपी व प्रभावी नियंत्रण मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
संयुक्त विशेष मोहीम राबविण्याची मागणी
जिल्ह्यातील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी विशेष संयुक्त मोहीम राबवावी, अशी मागणी सपकाळे यांनी प्रशासनाकडे केली आहे. विषारी दारू प्रकरणांमध्ये केवळ दारू सेवन करणाऱ्यांवर नव्हे तर दारू तयार करणारे, पुरवठा करणारे तसेच विक्री करणाऱ्या मुख्य सूत्रधारांवर कठोर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
यासोबतच जिल्ह्यातील संवेदनशील भागांमध्ये विशेष गस्त पथके नेमणे, गुप्त माहिती यंत्रणा अधिक सक्रिय करणे तसेच युवकांसाठी व्यसनमुक्ती जनजागृती मोहिमा राबविण्याची आवश्यकता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.




