
जळगावात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; शेळी ठार, दुसरी गंभीर जखमी
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरात भटक्या कुत्र्यांच्या टोळीने केलेल्या हल्ल्यात एका शेळीचा मृत्यू झाला असून दुसरी शेळी गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाबाबत प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर येथील रहिवासी इसाक बागवान यांच्या पाळीव शेळ्यांवर आज (दि. 24) पहाटे 3 ते 4 वाजेच्या सुमारास 10 ते 12 भटक्या कुत्र्यांच्या टोळीने हल्ला चढविला. या हल्ल्यात एका शेळीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरी शेळी गंभीर जखमी झाली आहे.
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पशुपालकांचे मोठे नुकसान झाले असून परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. शिवाजीनगरसह शहरातील अनेक भागांमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच पाळीव प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन महापालिका प्रशासनाने भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी इसाक बागवान यांनी केली आहे. तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी विशेष मोहीम राबविण्याचीही मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.





