
५० फूट खोल विहिरीत तिघे कोसळले; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली
महापौर दीपमाला काळे यांची घटनास्थळी भेट; जवानांच्या धाडसी कामगिरीचे कौतुक
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील गणेशवाडी परिसरात बुधवारी दुपारी घराच्या आवारातील सुमारे ५० फूट खोल विहिरीत तीन जण पडल्याची घटना घडली. विहिरीतील पाण्याची मोटार काढण्याचे काम सुरू असताना विहिरीवरील ढाबा (स्लॅब) अचानक कोसळल्याने तिघेजण थेट विहिरीत कोसळले. मात्र महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत धाडसी बचावकार्य राबविल्याने तिघांचेही प्राण वाचले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
मोटार काढताना घडला अपघात
गणेशवाडी येथील एका घराच्या मागील बाजूस असलेल्या विहिरीतील पाण्याची मोटार बाहेर काढण्याचे काम सुरू होते. यावेळी विहिरीवर असलेला ढाबा अचानक कोसळल्याने रामलाल हिरामण भावसार, सिद्धेश महेंद्र भावसार आणि देवेंद्र राजेंद्र खाचणे हे तिघे विहिरीत पडले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
धाडसी बचावकार्याने वाचले प्राण
मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे यांच्या नेतृत्वाखाली बचावकार्य सुरू करण्यात आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन घरडे हे स्वतः विहिरीत उतरले. जवानांनी अत्यंत शिताफीने आणि जीवाची पर्वा न करता राबविलेल्या बचाव मोहिमेमुळे तिन्ही व्यक्तींना जिवंत बाहेर काढण्यात यश आले.
दोघे उउपचारासाठीरुग्णालयात दाखल
या दुर्घटनेत जखमी झालेले रामलाल हिरामण भावसार आणि त्यांचा नातू सिद्धेश महेंद्र भावसार यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने तातडीने मदत मिळाल्याने मोठी जीवितहानी टळली.
महापौरांनी केली पाहणी
घटनेची माहिती मिळताच महापौर दीपमाला काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी अग्निशमन विभागाच्या जवानांनी दाखविलेल्या तत्परतेचे आणि धाडसाचे कौतुक केले. अशा प्रसंगी जवानांनी जीवाची बाजी लावून केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
अग्निशमन जवानांची मोलाची कामगिरी
या बचाव मोहिमेत मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे यांच्यासह वाहन चालक भारत बारीसर, देविदास सुरवाडे, निवांत इंगळे तसेच फायरमन रोहिदास चौधरी, तेजस जोशी, सुमित साळवे, यश मनोरे, चेतन सपकाळे, विठ्ठल पाटील आणि ऋषिकेश वाघ यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
“घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी अत्यंत धाडसाने आणि तत्परतेने बचावकार्य करून तिघांचे प्राण वाचवले. त्यांच्या या कार्याचे मनापासून कौतुक वाटते.”
— दीपमाला काळे, महापौर, जळगाव महानगरपालिका




