
जामनेरमध्ये मोठी घरफोडी; साडेआठ लाखांचा ऐवज लंपास, दोन आरोपी जेरबंद
२४ तासांत पोलिसांची धडक कारवाई ; ४ लाखांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने चोरीला
जामनेर: प्रतिनिधी जामनेर शहरातील मदनी नगर भागात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ८ लाख ५३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लांबवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये ४ लाखांची रोकड आणि २९.५ ग्रॅम सोन्यासह चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. याप्रकरणी जामनेर पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत २४ तासांच्या आत दोन सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.मसुद अख्तर मुझफ्फर हुसेन (वय ५०, रा. प्लॉट नं. ४२, मदनी नगर, जाकरीया मशिदीच्या मागे, जामनेर) यांनी याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी मसुद हुसेन हे २५ जून २०२६ रोजी रात्री ८:०० वाजेच्या सुमारास घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. दरम्यान, २९ जून २०२६ रोजी सकाळी ७:१५ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि ४ लाख रुपयांची रोकड असा एकूण ८ लाख ५३ हजार रुपयांचा माल चोरून चोरटे फरार झाले होते. २९ जून रोजी दुपारी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरीला गेलेला मुद्देमाल
या घरफोडीत एकूण ४,००,००० रुपयांची रोकड (ज्यात ५००, २०० आणि १०० रुपयांच्या नोटा होत्या), २ लाख ८० हजार रुपये किमतीचा २० ग्रॅमचा सोन्याचा हार, ७० हजार रुपयांची ५ ग्रॅमची मोती पोत, २८ हजार रुपयांची २ ग्रॅमची सोन्याची अंगठी, १४ हजार रुपयांची १ ग्रॅमची सोन्याची मुरणी, १४ हजार रुपयांची १ ग्रॅमची सोन्याची बाली, ७ हजार रुपयांचा अर्धा ग्रॅम सोन्याचा तुकडा आणि ४० हजार रुपये किमतीची १० भार वजनाची चांदीची पट्टी व २ भार वजनाच्या ४ लहान चांदीच्या अंगठ्या असा एकूण ८ लाख ५३ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला.
दोन आरोपींना पोलीस कोठडी
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून दोन संशयित आरोपींना निष्पन्न केले आणि २९ जून रोजी रात्री ९:५४ वाजता त्यांना बेड्या ठोकल्या. शेख समीर उर्फ बाल्या शेख जाकीर (वय २४, रा. BSNL टॉवरजवळ, घरकुल बिल्डिंग, जामनेर) आणि मोहम्मद फातीर उर्फ गोलू मिया तुफेल मोहम्मद (वय २०, रा. मदनी नगर, जामनेर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
या घटनेची माहिती मिळताच पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम आणि जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक कोकाटे या प्रकरणाचा पुढील तपास करत असून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याचे काम सुरू आहे.





