खान्देशजळगांवराजकीयशासकीय

जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ शरद पवार गटाने लढवावा

जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ शरद पवार गटाने लढवावा

मुंबईतील आढावा बैठकीत वरिष्ठ नेत्यांकडे मागणी

जळगाव/मुंबई: मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश कार्यालयात १६ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव जिल्हा व जळगाव महानगर आगामी विधानसभा निवडणुकीबाबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने लढवला जावा, अशी आग्रही मागणी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे करण्यात आली.

सदर बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, प्रदेश सरचिटणीस आमदार रोहित पवार, उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी माजी आमदार सुनील भुसारा, प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार, जळगाव जिल्हा निरीक्षक भास्करराव काळे आणि युवक प्रदेशाध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

या आढावा बैठकीदरम्यान जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील महानगरपालिका निवडणुकांसह २०१४ ते २०२४ या कालावधीत झालेल्या विविध निवडणुकांमधील राजकीय परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सर्व बाजूंचा विचार केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

या महत्त्वपूर्ण बैठकीस जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रमोदबापू पाटील, धुळे जिल्हा निरीक्षक दिलीप खोडपे, जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, कार्याध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष किरण राजपूत, महानगर युवक अध्यक्ष विनायक पाटील आणि ओबीसी सेलचे महानगर अध्यक्ष गिरीश सांगळे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button