खान्देशजळगांवसामाजिक

भरतनाट्यम, संतूर वादनाची  रसिकांनी अनुभवली जुगलबंदी

भरतनाट्यम, संतूर वादनाची  रसिकांनी अनुभवली जुगलबंदी
 जळगाव  : रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टतर्फे शनिवारी रात्री छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात डान्स ॲन्ड ट्यून्स हा संतूरवादन व भरतनाट्यम्‌ नृत्याविष्काराची जुगलबंदी रसिकांनी अनुभवली.
      प्रारंभी भरतनाट्यम्‌ कलावंत डॉ.स्वाती दैठणकर यांच्यासह व्यासपीठावर उपस्थित रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३०चे डीजीएन डॉ. राजेश पाटील,सहप्रांतपाल उमंग मेहता, रोटरी वेस्टचे माजी अध्यक्ष संदीप काबरा अध्यक्ष विनीत जोशी, प्रशासकीय सचिव भद्रेश शाह, प्रकल्प सह प्रमुख नेहा जोशी, यांच्याहस्ते दीपप्रज्वलन, नटराज पूजनाने कार्यक्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले.
     कार्यक्रमास आमदार राजूमामा भोळे, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकी पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन वेणू जोशी हिने केले. कोषाध्यक्ष सी.ए.स्मिता बाफना यांनी आभार मानले.
        सुरवातीला डॉ. स्वाती दैठणकर यांच्यासह त्यांच्या शिष्या राजलक्ष्मी बागडे, मैथिली साने व श्रेया जोशी यांनी विविध भावमुद्रा, कथानकांसह भरतनाट्यम्‌चा नृत्याविष्कार सादर केला.
         गणेशवंदना, विष्णू- महादेवावर आधारित ‘हरि हर’ संकल्पना, संत नामदेवांच्या गुरुवाणीवर आधारित मराठी- पंजाबी भक्तिगीतावर नृत्यवाणी सादर केली. डॉ.स्वाती दैठणकर यांनी एकल भरतनाट्यमचा प्रयोग सादर करताना गजेंद्रमोक्षम, द्रौपदी वस्त्रहरण शीळेतून अहिल्या प्रगटली, रामायणातील शबरी इत्यादी कथानक रसिकांसमोर उभे केले. समारोपात विठ्ठलाचा अभंग आरतीरुपात नृत्यातून सादर करण्यात आला.
दुसऱ्या सत्रात डॉ. धनंजय दैठणकर व त्यांचे पुत्र निनाद यांनी युगल संतूर वादन सादर केले. प्रारंभी राग यमनमधील आलाप, नंतर मध्य द्रूत तीन तालातील बंदीश सादर करत पिता-पुत्रांनी रसिकांची मने जिंकली. नंतरच्या टप्प्यात दोघांच्या सादरीकरणाने रसिकांना अक्षरश: मोहिनी घातली. ओंकार तोडकर यांनी तबल्यावर दमदार साथसंगत करत श्रोत्यांना मंत्रमुग्ध गेले.
कार्यक्रमातील अंतिम टप्प्यात दैठणकर परिवारातील संतूर वादन व भरतनाट्यम्‌ची जुगलबंदी जळगावकर रसिकांना अभुवायला मिळाली. डॉ. धनंजय व निनाद दैठणकर यांच्या संतूर वादनावर डॉ. स्वाती दैठणकर यांनी विविध कथानकांसह भावमुद्रांच्या आधारे नृत्याविष्कार सादर केला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील मंत्री, मुकेश हासवानी, रोटरी वेस्टचे माजी अध्यक्ष कृष्णकुमार वाणी, सुनील सुखवानी, प्रकल्प प्रमुख योगेश राका, देवेश कोठारी यांच्यासह सर्व सदस्य व त्यांच्या कुटुंबीयांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button