

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे ‘त्रिवेणी’ शिक्षक कार्यशाळा उत्साहात
शिक्षणाचा उद्देश, स्वरूप आणि भारतीय ज्ञानपरंपरेच्या पुनर्शोधावर चिंतन; ३५ शिक्षकांचा सहभाग
जळगाव | प्रतिनिधी
गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे एकदिवसीय ‘त्रिवेणी’ शिक्षक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. शिक्षणाचा मूळ उद्देश, त्याचे स्वरूप तसेच भारतीय ज्ञान आणि शैक्षणिक परंपरेचा पुनर्शोध या विषयांवर कार्यशाळेत विविध सत्रांच्या माध्यमातून चिंतन करण्यात आले. वर्धा येथील नई तालीम समितीचे सचिव व संचालक प्रभाकर पुसदकर यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.
कार्यशाळेस अनुभूती निवासी स्कूलच्या संचालिका निशा जैन, संस्थेचे विश्वस्त डॉ. सुदर्शन अय्यंगार, रिसर्च डीन डॉ. गीता धरमपाल, अंबिका जैन यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. अनुभूतीच्या चारही विभागांसह मातोश्री आणि इंपिरिअल इंटरनॅशनल स्कूलमधील एकूण ३५ शिक्षकांनी कार्यशाळेत सहभाग घेतला.
गांधीजींच्या नई तालीमवर मार्गदर्शन
प्रभाकर पुसदकर यांनी ‘नई तालीम’ या विषयावर विचारप्रवर्तक सत्र घेतले. शिक्षणाच्या मूळ उद्देशाचा शिक्षकांनी पुनर्विचार करावा आणि गांधीजींच्या नई तालीमची तत्त्वे आजच्या शैक्षणिक व्यवहारात प्रत्यक्षात कशी आणता येतील, यावर त्यांनी मार्गदर्शन केले.
प्रा. गीता धरमपाल यांनी भारताच्या समृद्ध शैक्षणिक वारशावर तसेच प्रसिद्ध विचारवंत धरमपाल यांच्या संशोधनावर प्रकाश टाकला. बाल व विद्या निकेतनचे प्राचार्य मनोज परमार यांनी पारंपरिक चौकटीपलीकडे जाऊन अनुभवाधारित शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले.
देवयानी मनोज यांनी सहभागी आणि चिंतनात्मक उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या गरजांप्रती अधिक संवेदनशील राहण्याचे आवाहन केले. तसेच शिक्षक आणि पालक या भूमिकांचे आत्मपरीक्षण करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. अनुभूती निवासी विद्यालयाचे इंग्रजी शिक्षक अभिनव चतुर्वेदी यांनी शिक्षण प्रक्रियेत भाषा, संवाद आणि विद्यार्थ्यांचा सहभाग यांचे महत्त्व स्पष्ट केले.
शिक्षकांसाठी स्वतंत्र व्यासपीठाची संकल्पना
कार्यशाळेच्या समारोपावेळी ‘TRIVENI Educators Network’ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली. या नेटवर्कच्या माध्यमातून विविध शाळांमधील शिक्षकांना एका व्यासपीठावर आणून अनुभवांची देवाणघेवाण करण्याबरोबरच कार्यशाळेतून मिळालेली अंतर्दृष्टी प्रत्यक्ष वर्गातील अध्यापन प्रक्रियेत वापरण्यास प्रोत्साहन मिळणार आहे.
कार्यक्रमाचे संचालन रिसर्च फेलो गिरीश पाटील आणि रिसर्च असिस्टंट मोनालिसा सोमवंशी यांनी केले. शिक्षणाच्या पारंपरिक दृष्टिकोनासोबत भारतीय ज्ञानपरंपरा आणि अनुभवाधारित शिक्षण यांचा समन्वय साधण्याच्या दृष्टीने ही कार्यशाळा शिक्षकांसाठी मार्गदर्शक ठरली.




