खान्देशगुन्हेजळगांव

माशांचे जेवण वडिलांना न दिल्याने वाद; दोन मित्रांनी दगडाने ठेचून मित्राला संपवले

माशांचे जेवण वडिलांना न दिल्याने वाद; दोन मित्रांनी दगडाने ठेचून मित्राला संपवले

भालोद गावातील धक्कादायक घटना; फैजपूर पोलिसांची तत्पर कारवाई, दोन्ही संशयित आरोपी अटकेत

फैजपूर | प्रतिनिधी

माशांचे जेवण वडिलांना का दिले नाही, या किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाचे पर्यवसान थेट हत्येत झाल्याची धक्कादायक घटना फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भालोद गावात घडली. दारूच्या नशेत झालेल्या वादानंतर दोन मित्रांनी आपल्या साथीदाराच्या डोक्यात दगडाने मारहाण करून त्याचा जीव घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यानंतर मृतदेह एमएसईबीजवळील सुमारे १०० मीटर अंतरावरील खड्ड्यात फेकून दिल्याचेही निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी फैजपूर पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

रमेश ईश्वरसिंग भावर (वय ३५, रा. खंडवा, मध्य प्रदेश) असे मृत मजुराचे नाव आहे. सूरज कोळी आणि सूरज ऊर्फ गोलू नेमाडे अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

मयत रमेश भावर आणि दोन्ही आरोपी मजुरीचे काम करीत होते. कामानिमित्त त्यांची एकमेकांशी मैत्री झाली होती. तिघांनाही एकत्र दारू पिण्याची सवय होती. घटनेच्या दिवशी रात्री सुमारे ८ ते ८.३० वाजेच्या सुमारास तिघेही भालोद येथे एकत्र बसून दारू पीत होते.

दरम्यान, रमेश भावर याने स्वतःच्या पैशातून मासे विकत आणले होते. हे मासे त्याने मुकेश नावाच्या मित्राकडे जेवण तयार करण्यासाठी दिले होते. जेवण तयार होत असताना आरोपी सूरज कोळी याने आपल्या वडिलांनाही त्यातून जेवण देण्याचा आग्रह केला. याच मुद्द्यावरून रमेश आणि सूरज यांच्यात वाद सुरू झाला.

किरकोळ कारणावरून सुरू झालेला हा वाद काही वेळातच विकोपाला गेला. बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी सूरज कोळी आणि सूरज ऊर्फ गोलू नेमाडे यांनी रमेश भावर याच्या डोक्यात दगडाने मारहाण केली. गंभीर दुखापतीमुळे रमेश याचा मृत्यू झाल्याचे तपासात समोर आले आहे.

घटनेनंतर दोन्ही आरोपींनी रमेशचा मृतदेह घटनास्थळापासून सुमारे १०० मीटर अंतरावर असलेल्या एमएसईबीजवळील खड्ड्यात नेऊन टाकला. त्यानंतर तेथून निघून गेले.

घटनेची माहिती मिळताच फैजपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला. प्राथमिक माहिती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे संशयित आरोपींचा शोध घेण्यात आला. तपासादरम्यान सूरज कोळी आणि सूरज ऊर्फ गोलू नेमाडे यांना ताब्यात घेण्यात आले.

या घटनेमुळे भालोद परिसरात खळबळ उडाली आहे. क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद इतका टोकाला गेला की, काही वेळापूर्वी एकत्र बसलेल्या तिघांपैकी एकाचा जीव गेला. फैजपूर पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button