खान्देशजळगांवशिक्षणसामाजिक

उच्च शिक्षणाच्या नव्या संधींची विद्यार्थ्यांना ओळख

उच्च शिक्षणाच्या नव्या संधींची विद्यार्थ्यांना ओळख

इकरा एच. जे. थीम महाविद्यालयात ‘औपचारिक, दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण तसेच कौशल्य विकास’ विषयावर राष्ट्रीय परिसंवाद

जळगाव, प्रतिनिधी : उच्च शिक्षणाच्या बदलत्या स्वरूपाची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, औपचारिक शिक्षणासोबतच दूरस्थ व ऑनलाइन शिक्षणाच्या संधींची ओळख व्हावी आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमतांना नवी दिशा द्यावी, या उद्देशाने इकरा एज्युकेशन सोसायटी संचलित एच. जे. थीम कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, मेहरूण येथे एकदिवसीय राष्ट्रीय परिसंवाद व अभिमुखता कार्यक्रम उत्साहात पार पडला.

मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटी (MANUU), हैदराबादच्या केंद्राच्या माध्यमातून आयोजित या परिसंवादाचा विषय ‘औपचारिक, दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण तसेच कौशल्य व क्षमता बांधणी’ असा होता. कार्यक्रमादरम्यान इकरा एच. जे. थीम महाविद्यालय आणि मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटी यांच्यात परस्पर सहकार्यासाठी सामंजस्य करार (MOU) करण्यात आला. या करारामुळे दोन्ही शैक्षणिक संस्थांमधील शैक्षणिक सहकार्याला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

कुराण पठणाने कार्यक्रमाची सुरुवात

कार्यक्रमाची सुरुवात प्रा. डॉ. अख्तर शाह यांच्या कुराण पठणाने झाली. त्यानंतर डॉ. तनवीर खान यांनी प्रास्ताविकातून परिसंवादाचा उद्देश स्पष्ट केला. प्रा. डॉ. मुस्तकिम बागवान यांनी अध्यक्षीय अनुमोदन केले. यावेळी ‘तराना-ए-इकरा’ सादर करण्यात आला.

इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटीचे संचालक रझाउल्ला खान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुंबईचे डॉ. अब्दुल बरकात आणि डॉ. निसार अहमद पीरजादा यांनी विशेष अतिथी म्हणून सहभाग घेतला.

उच्च शिक्षणातील विविध संधींवर मार्गदर्शन

कार्यक्रमात डॉ. अब्दुल बरकात यांनी उच्च शिक्षण आणि विद्यार्थ्यांसमोरील विविध संधींबाबत विचार मांडले. प्रमुख पाहुणे रझाउल्ला खान यांनी उच्च शिक्षणाच्या विविध पर्यायांवर सविस्तर मार्गदर्शन केले. औपचारिक शिक्षणासोबतच दूरस्थ व ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या संधी तसेच कौशल्य विकासाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकार शेख यांनी कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट करताना विद्यार्थ्यांनी बदलत्या शैक्षणिक क्षेत्रानुसार स्वतःमध्ये आवश्यक कौशल्ये विकसित करण्याची गरज व्यक्त केली.

विद्यार्थ्यांनी संधींचा लाभ घ्यावा

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार यांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या उपलब्ध संधींचा पुरेपूर लाभ घेण्याचे आवाहन केले. उच्च शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणावे आणि आपल्या भविष्यासाठी योग्य दिशा निवडावी, असे त्यांनी सांगितले.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमास डॉ. इफ्रान इक्बाल, सईदा वकील, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. तनवीर खान, प्रा. अंजली कुलकर्णी यांच्यासह प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. बी.एड. महाविद्यालयाचे प्राचार्य व कर्मचारी, डी.एड. महाविद्यालयाचे प्राचार्य, कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मौलाना मुजम्मिल काझी यांनी केले. शेवटी प्रा. डॉ. चांद खान यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button