जळगांव

वाघूरचे पाणी जळगावसाठीच राखीव ठेवा

वाघूरचे पाणी जळगावसाठीच राखीव ठेवा

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आयुक्तांना निवेदन; ९ ऑक्टोबरच्या महासभेतील प्रस्तावाला विरोध

जळगाव, प्रतिनिधी : जळगाव शहराची वाढती लोकसंख्या, सध्या सुरू असलेली दोन दिवसाआड पाणीपुरवठ्याची स्थिती आणि भविष्यातील दुष्काळाचे संभाव्य संकट लक्षात घेता वाघूर धरणातील पाणी जळगाव शहरासाठीच राखीव ठेवावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या जळगाव महानगर पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याबाबत महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

येत्या ९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महासभेत वाघूर धरणातील पाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच इतर ठिकाणी पाइपलाइनद्वारे वळविण्याबाबत प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या प्रस्तावाला पक्षाने विरोध दर्शविला आहे.

जळगाव शहराचा सातत्याने विस्तार होत असून भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यातच एल निनोच्या पार्श्वभूमीवर दुष्काळाचे संकट निर्माण होण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आणि संस्थांकडून वेळोवेळी व्यक्त करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत शहराच्या हक्काचे पाणी इतरत्र वळविणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका पक्षाने मांडली.

शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देण्यात आले असताना सध्या नागरिकांना दोन दिवसाआड पाणी मिळत आहे. त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईचा विचार करून कोणताही निर्णय घेणे गरजेचे आहे. वैद्यकीय महाविद्यालय, क्रीडा संकुल यांसारखे मोठे प्रकल्प उभारण्यापूर्वी त्यांच्या पाण्याची गरज आणि स्वतंत्र जलव्यवस्थेचे नियोजन करणे आवश्यक होते. मात्र प्रकल्प उभारल्यानंतर पाण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न होत असल्याने हा चुकीचा पायंडा पडत असल्याची टीका निवेदनातून करण्यात आली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीच्या बांधकामादरम्यान पाण्याची उपलब्धता कशी करण्यात आली, तसेच बांधकामासाठी आवश्यक क्युरिंगचे काम कशा पद्धतीने झाले, याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली. बांधकामाच्या दर्जाबाबत शंका असल्याने याची तांत्रिक तपासणी होणे आवश्यक असल्याचे पक्षाने म्हटले आहे.

जळगावकरांच्या हक्काचे पाणी इतरत्र वळविण्याचा निर्णय भविष्यात नागरिकांच्या रोषाला कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे सर्व नगरसेवकांनी शहराच्या हिताचा विचार करून वाघूर धरणातील पाणी जळगावसाठी राखीव ठेवण्याच्या बाजूने निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

दरम्यान, निवेदन देणाऱ्या पदाधिकाऱ्यांशी महानगरपालिका आयुक्तांनी सकारात्मक चर्चा केली. मांडण्यात आलेल्या काही मुद्द्यांवर सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याची माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जळगाव महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, कार्याध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी, राजू मोरे, मंगला पाटील, मजहरभाई पठाण, सुनील माळी, किरण राजपूत, विनायक पाटील, नईम खाटिक, गणेश पाटील, नामदेव वाघ, जाहिद शेख, सतीश चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button