खान्देशगुन्हेजळगांव

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी आणि पशुपालकांना तातडीने मदत द्या!

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी आणि पशुपालकांना तातडीने मदत द्या!

जळगाव जिल्हा एकता संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन; पाणी, चारा, रोजगार आणि पीक नुकसानभरपाईची मागणी

जळगाव, प्रतिनिधी : महाराष्ट्रात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, पशुपालक आणि ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीने मदत देण्यात यावी, या मागणीसाठी जळगाव जिल्हा एकता संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

दुष्काळग्रस्त भागांना तातडीची आर्थिक मदत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पशुधनासाठी चारा व पाणी, रोजगार हमीची कामे सुरू करणे, पीक नुकसानीची भरपाई आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच महिला बचत गटांना आर्थिक दिलासा देण्यासह दीर्घकालीन जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर सुरू करण्याची मागणीही करण्यात आली.

सरकारने गावागावांत पोहोचून मदत द्यावी

“दुष्काळग्रस्त नागरिकांना मदत मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत. शासनाने स्वतः गावागावांत पोहोचून नागरिकांना त्यांचा हक्क आणि तातडीची मदत उपलब्ध करून द्यावी,” अशी भूमिका एकता संघटनेच्या वतीने रिझवान शेख यांनी मांडली.

दुष्काळ निवारणासाठी शासनाने तातडीने ठोस निर्णय घेऊन त्यांची कालमर्यादेत अंमलबजावणी करावी, अशी मागणी संघटनेचे समन्वयक फारुक शेख अब्दुल्ला यांनी केली.

निवेदन देताना फारुक शेख, रिझवान शेख, अॅड. जफर मिर्झा, मजहर खान, मतीन पटेल, अन्वर सिकलगार, सईद शेख, जावेद शेख, वसीम चांद आणि नजमुद्दीन शेख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो ओळ : निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांना निवेदन देताना रिझवान शेख, फारुक शेख, मजहर पठाण, मतीन पटेल आदी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button