
आनंद मेळ्यात पैशांच्या वादातून चॉपरने वार; १,५०० रुपये लुटले
मेळा आयोजकासह दोघांना मारहाण; एक हल्लेखोर ताब्यात, दोघे फरार

जळगाव, प्रतिनिधी :
खान्देश मिल कॉम्प्लेक्स परिसरातील आनंद मेळ्यात पैशांची मागणी करत तीन जणांनी मेळा आयोजकासह दोघांना बेदम मारहाण केली. यावेळी एका तरुणावर चॉपरसारख्या धारदार शस्त्राने वार करून त्याच्या खिशातील १ हजार ५०० रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेण्यात आली. ही घटना १२ नोव्हेंबर रोजी रात्री घडली.
अरबाज शकील शेख (वय २६, रा. उस्मानिया पार्क, जळगाव) यांनी खान्देश मिल कॉम्प्लेक्स परिसरात आनंद मेळा आयोजित केला आहे. गुरुवारी रात्री तीन संशयित तरुण मेळ्याच्या ठिकाणी आले. त्यांनी मेळा भरवल्याच्या मोबदल्यात पैशांची मागणी करत अरबाज शेख यांच्याशी वाद घातला. शेख यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तिघांनी त्यांना बेदम मारहाण केली. यावेळी एका संशयिताने धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केले आणि खिशातील १ हजार ५०० रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली.
दरम्यान, मेळा पाहण्यासाठी आलेले मोहम्मद अनस खान खलील खान (रा. शाहूनगर) यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, संशयितांनी त्यांनाही मारहाण केली.
या प्रकरणी अरबाज शकील शेख यांच्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलिस ठाण्यात तिन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका हल्लेखोराला घटनास्थळावरून ताब्यात घेतले असून, अन्य दोघे अंधाराचा फायदा घेत फरार झाले.




