
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज करण्यास २५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
जळगाव, प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील उत्कृष्ट खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतात. आता इच्छुक खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, दिव्यांग खेळाडू तसेच साहसी उपक्रमात सहभागी झालेल्या खेळाडू व व्यक्तींना २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.

या पुरस्कारांमध्ये क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडामहर्षीकरीता जीवनगौरव पुरस्कार व क्रीडा मार्गदर्शकांकरिता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक / जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक) शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), खेळाडू शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
शासन निर्णय नुसार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारित नियमावली २०२३ निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार यापूर्वी १२ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. त्यास आता २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
इच्छुकांनी क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे यांनी केले आहे.




