खान्देशराजकीय

जिल्हा बँक निवडणुकीतील कथित गैरप्रकारांची चौकशी करा; निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्याची महाविकास आघाडीची मागणी

जिल्हा बँक निवडणुकीतील कथित गैरप्रकारांची चौकशी करा; निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्याची महाविकास आघाडीची मागणी

जळगाव, प्रतिनिधी : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठी होणाऱ्या संचालक मंडळाच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापले आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान उमेदवारी अर्जांच्या छाननीपासून माघारीपर्यंत दबावाचे राजकारण झाल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निलंबित करावे आणि निवडणूक प्रक्रिया स्थगित करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांकडून राजकीय दबावाचा वापर करून अनेक उमेदवारांचे अर्ज नामंजूर करण्यात आल्याचा आरोप आहे. एका उमेदवाराचा अर्ज जळगाव येथे नामंजूर करण्यात आला होता. त्यानंतर संबंधित उमेदवाराने नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात अपील दाखल केले असता त्याचा अर्ज मंजूर करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणाचा उल्लेख चाळीसगाव येथील आमदारांनी युतीच्या मेळाव्यात प्रसारमाध्यमांसमोर केल्याचा दावाही महाविकास आघाडीने केला आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज नामंजूर आणि त्यानंतर अपीलात मंजूर होण्यामागील प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवडणूक प्रक्रियेत सत्तेचा, पैशाचा आणि राजकीय बळाचा वापर झाल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे. अनेक जागा बिनविरोध करण्यात आल्या असून, उर्वरित नऊ जागांसाठी मतदारांना आर्थिक प्रलोभने दाखविणे तसेच दबाव आणण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे.

आधीच निवडणूक प्रक्रियेबाबत विविध प्रश्न उपस्थित होत असताना, अशा प्रकारांमुळे निवडणुकीच्या पारदर्शकतेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन उमेदवारी अर्जांबाबत झालेल्या निर्णयांची, बिनविरोध निवडींची आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन करून चौकशी पूर्ण होईपर्यंत निवडणूक प्रक्रिया स्थगित करावी, अशी मागणी महाविकास आघाडीने केली आहे.

या निवेदनावेळी अशोक लाडवंजारी, राजू मोरे, अमोल कोल्हे, किरण राजपूत, सुनील भैय्या माळी, गिरीश सांगळे, गणेश पाटील, राहुल भालेराव, रफीक पटेल, सुहास चौधरी, अबजेत खाटीक, इब्राहिम खान यांच्यासह महाविकास आघाडीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button