खान्देशगुन्हेजळगांव

एटीएस अधिकारी असल्याचे भासवून शिक्षकाला ३२ लाखांचा गंडा

अटक आणि बदनामीची धमकी देत सायबर भामट्यांकडून फसवणूक; सायबर पोलिसांनी २७ लाख रुपये रोखले

एटीएस अधिकारी असल्याचे भासवून शिक्षकाला ३२ लाखांचा गंडा

अटक आणि बदनामीची धमकी देत सायबर भामट्यांकडून फसवणूक; सायबर पोलिसांनी २७ लाख रुपये रोखले

जळगाव, प्रतिनिधी : दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप करून अटक आणि बदनामीची धमकी देत सायबर भामट्यांनी सावदा येथील ५३ वर्षीय शिक्षकाला तब्बल ३२ लाख ४० हजार रुपयांचा गंडा घातला. मुंबई एटीएसचे अधिकारी असल्याचे भासवून शिक्षकाला भीती दाखवत २९ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबरदरम्यान वेळोवेळी पैसे उकळण्यात आले. या प्रकरणी सायबर पोलिसांनी कारवाई करत फसवणुकीच्या रकमेपैकी २७ लाख रुपये संबंधित बँक खात्यांत रोखले आहेत.

रावेर तालुक्यातील सावदा येथील ५३ वर्षीय शिक्षक २९ ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांना शिकवत असताना त्यांना विशाल ठाकूर नावाच्या व्यक्तीचा व्हॉट्सॲप कॉल आला. मुंबई एटीएसमधून पोलीस उपनिरीक्षक बोलत असल्याचे सांगून पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांकडे शिक्षकांच्या नावावरील मोबाइल क्रमांक आढळल्याचा दावा करण्यात आला. तसेच त्यांच्या आधारकार्डचा वापर करून बँक खाते उघडण्यात आले असून, त्या खात्यावर सात कोटी रुपये जमा झाल्याचे सांगण्यात आले. त्यापैकी अडीच लाख रुपये शिक्षकांनी घेतल्याचा आरोप करून त्यांना घाबरवण्यात आले.

बंद खोलीत बसण्याची सूचना; अटकेची धमकी

यानंतर शिक्षकाला घरी जाऊन बंद खोलीत बसण्यास सांगण्यात आले. तसेच आयपीएस अधिकारी मनोजकुमार शर्मा यांना दर तासाला माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या. ३० ऑक्टोबर रोजी पुन्हा व्हिडिओ कॉल करून अटक आणि बदनामीपासून वाचायचे असेल, तर बँक खात्यावर पैसे जमा करण्याची मागणी करण्यात आली.

घाबरलेल्या शिक्षकाने सुरुवातीला तीन लाख रुपये पाठवले. मात्र, त्यानंतरही पैशांची मागणी सुरूच राहिल्याने त्यांनी एसआयपी आणि इतर बचत प्रमाणपत्रे मोडून वेळोवेळी पैसे पाठवले. अशा प्रकारे एकूण ३२ लाख ४० हजार रुपये उकळण्यात आले. पाठवलेल्या रकमेची सेबीमार्फत तपासणी केली असता ती काळ्या पैशांची असल्याचे निष्पन्न झाल्याचा बनावही सायबर भामट्यांनी केला. पोलीस, ईडी आणि अन्य तपास यंत्रणांच्या नावाने धमकावत त्यांच्याकडे आणखी पैशांची मागणी करण्यात आली.

सायबर पोलिसांकडून २७ लाख रुपये होल्ड

२९ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबरदरम्यान सुरू असलेल्या या प्रकारात वारंवार पैशांची मागणी होऊ लागल्याने शिक्षकाला संशय आला. त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार २६ नोव्हेंबर रोजी विशाल ठाकूर आणि मनोजकुमार शर्मा या नावांचा वापर करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रार प्राप्त होताच सायबर पोलिसांनी संबंधित बँक खात्यांची तपासणी केली. फसवणुकीच्या एकूण रकमेपैकी २७ लाख रुपये रोखण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button