माजी नगरसेवक महेश चौधरी यांचे निधन
खान्देश टाइम्स न्यूज | ८ डिसेंबर २०२३ | जळगाव शहर महानगरपालिकेचे माजी स्वीकृत नगरसेवक महेश चौधरी यांचे हृदयविकाराच्या आजाराने शुक्रवार दि.८ डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास रुग्णालयात उपचार घेताना निधन झाले आहे. भाजपकडून त्यांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी देण्यात आली होती.
महेश रतन चौधरी हे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष व कट्टर कार्यकर्ते होते. भाजपने त्यांना जळगाव मनपात स्वीकृत सदस्य म्हणून संधी दिल्याने ते नगरसेवक झाले होते. महेश चौधरी यांना गेल्या तीन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर शिवराम नगर परिसरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना शुक्रवारी संध्याकाळी साडे सात वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
महेश चौधरी यांच्या निधनाची वार्ता कळताच कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रातील नागरिकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली आहे. महेश चौधरी हे छोटूभाऊ म्हणून परिचित होते. त्यांचे वडील आर. टी. अण्णा चौधरी हे देखील माजी नगरसेवक होते. तसेच, महेश चौधरी हे तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, १ मुलगी, पुतण्या, पुतणी असा परिवार आहे.