
पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; दोन चोरीचे गुन्हे अवघ्या तीन तासांत उघड
मुद्देमालासह आरोपी ताब्यात; नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक
पाचोरा : प्रतिनिधी पाचोरा पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे दोन चोरीचे गुन्हे अवघ्या तीन तासांत उघडकीस आणत संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळविले आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरात समाधानाचे वातावरण असून पोलिसांवर नागरिकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नय्युम जहांगिर देशमुख (रा. आक्सानगर, जारगाव, ता. पाचोरा) यांच्या इलेक्ट्रिक दुकानाच्या गोडाऊनमधून सुमारे ९४ हजार ५०० रुपये किमतीचे गोदरेज कंपनीचे तीन एसी अज्ञात चोरट्यांनी १ एप्रिल ते १४ एप्रिलदरम्यान चोरून नेले होते. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शोध पथकाने तत्काळ तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी रिहान हमीश शहा (वय २२, रा. हनुमाननगर, पाचोरा) याला ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून चोरीस गेलेले तीन एसी जप्त करण्यात आले. याच आरोपीने दुसऱ्या एका प्रकरणात ३० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत चोरी केल्याची बाबही उघड झाली. संबंधित गुन्हा (क्र. १७४/२०२६) देखील उघडकीस आणण्यात आला असून त्या प्रकरणातील मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई गुन्हे शोध पथकातील विलास पाटील, वसीम शेख, श्रीकांत गायकवाड, योगेश पाटील, संदीप राजपूत व गणेश कुंवर यांनी केली.





