
वाचन संस्कृतीसाठी ‘बुके ऐवजी बुक’ संकल्पना रुजविण्याची गरज : आ. राजूमामा भोळे
▪ ‘भारताची प्रतिभा’ पुस्तकाच्या लेखांचे अभिवाचन संपन्न
▪ ग्रामगौरव व रोटरी क्लब ऑफ जळगाव ग्रीनसिटीचा संयुक्त उपक्रम
▪ माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या आठवणी जागृत
प्रतिनिधी| जळगाव : मोबाईल व सामाजिक माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे वाचन संस्कृतीला मर्यादा येत असल्या तरी पुस्तके हीच व्यक्तिमत्त्व घडवणारी खरी साधने आहेत. त्यामुळे समाजात ‘बुके ऐवजी बुक’ ही संकल्पना रुजविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार राजूमामा भोळे यांनी केले.
ग्रामगौरव प्रकाशन व रोटरी क्लब ऑफ जळगाव ग्रीनसिटी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पुस्तक दिनानिमित्त काव्यरत्नावली चौकात ‘भारताची प्रतिभा’ या पुस्तकातील निवडक लेखांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. भोळे होते.
या वेळी पुस्तकाचे संपादक सुरेश उज्जैनवाल, ग्रामगौरवचे संस्थापक विवेक ठाकरे, जळगाव जिल्हा बँकेचे एलडीएम सुनील डोहरे, जैन उद्योग समूहाचे माध्यम उपाध्यक्ष अनिल जोशी, रोटरी क्लबचे सचिव अॅड. अभय कुलकर्णी, संत गाडगेबाबा युवा फाउंडेशनचे कार्याध्यक्ष राजेंद्र सोनवणे, शितल साळी, रत्नाकर पाटील, डॉ. पूजा वाघ आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात ‘भारताची प्रतिभा’ या पुस्तकातील माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यावरील निसर्गकवी पद्मश्री ना. धो. महानोर यांच्या लेखाचे वाचन प्रा. रामचंद्र पाटील यांनी केले, तर ‘माझी आई… ताई’ हा लेख सौ. ज्योती राठोर यांच्या लेखनातून अपूर्वा पुष्कराज वाणी यांनी सादर केला. या अभिवाचनामुळे उपस्थितांमध्ये प्रतिभाताई पाटील यांच्या आठवणी जागृत झाल्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संपादक सुरेश उज्जैनवाल यांनी प्रास्ताविकातून उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. सूत्रसंचालन धनश्री ठाकरे यांनी केले, तर आभार दिनेश थोरात यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विविध कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.





