
कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून गृहिणीची फसवणूक; फुले मार्केटमध्ये सोन्याची पोत लंपास
अज्ञात भामट्या महिलेने साधला डाव; जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी): शहरातील अत्यंत गजबजलेल्या फुले मार्केट परिसरात एका अज्ञात महिलेने ‘कर्ज मिळवून देते’ असे आमिष दाखवून एका गृहिणीला लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गृहिणीच्या २१ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक झाली असून, जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असा रचला फसवणुकीचा सापळा
पिंप्राळा परिसरातील वृंदावन सोसायटीत राहणाऱ्या छाया कमलाकर वाणी (५८) या दि. २ मे रोजी दुपारी फुले मार्केटमध्ये खरेदीसाठी आल्या होत्या. दुपारी ४ वाजेच्या सुमारास गुप्ताजी शेव दुकानासमोरील जिन्याजवळ एका अज्ञात महिलेने त्यांच्याशी ओळख वाढवली. गप्पांच्या ओघात ‘तुम्हाला कर्ज मिळवून देते’ असे आमिष दाखवत या महिलेने त्यांचा विश्वास संपादन केला.
दागिने घेऊन महिला पसार
कर्ज मिळवून देण्याच्या प्रक्रियेचे नाटक करत, संबंधित महिलेने छाया वाणी यांच्याकडील ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पदक आणि ५ ग्रॅम सोन्याचे मणी असलेली पोत युक्तीने काढून घेतली. फिर्यादी काही समजण्याच्या आतच सदर महिला दागिने घेऊन गर्दीचा फायदा घेत पसार झाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच छाया वाणी यांनी तातडीने पोलीस ठाणे गाठले.
या प्रकरणी छाया वाणी यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) अन्वये अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण वाघ करत आहेत. पोलीस आता मार्केट परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या भामट्या महिलेचा शोध घेत आहेत.





