घरातून दागिने चोरणाऱ्या घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदार जेरबंद; ४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
एमआयडीसी पोलिसांची कारवाई

घरातून दागिने चोरणाऱ्या घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदार जेरबंद; ४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
एमआयडीसी पोलिसांची कारवाई
जळगाव | प्रतिनिधी
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेहरूण तलाव परिसरात घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावत घरकाम करणाऱ्या महिलेसह तिच्या साथीदाराला अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे ४ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
घरातून दागिने लंपास
मेहरूण तलाव परिसरातील लेकसाईड रेसिडेन्सी येथे राहणाऱ्या सौ. सुधा प्रभुनाथ कावरा (वय ५१) यांनी १२ जून रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या घरातून तसेच समोर राहणाऱ्या तेजल पियुष संचेती यांच्या घरातून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे उघड झाले होते. घरकामासाठी येणाऱ्या महिलेवर संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली.
तांत्रिक विश्लेषणातून आरोपींचा शोध
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना सखोल तपासाचे निर्देश दिले. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत घरकाम करणाऱ्या महिलेने साथीदाराच्या मदतीने चोरी केल्याचे निष्पन्न केले.
महिलेची कबुली; साथीदारालाही अटक
पोलिसांनी समताबाई धर्मराज धांडेकर (वय ४१, रा. येणुका नगर, रमेश्वर कॉलनी, जळगाव, मूळ रा. धारणी, जि. अमरावती) हिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने चोरीची कबुली दिली. तसेच ही चोरी धर्मराज हरिसिंग मीना (वय २८, रा. पिपाराई, गंजबसौदा, जि. विदिशा, मध्यप्रदेश) याच्या मदतीने केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी धर्मराज मीनालाही अटक केली.
४ लाखांचे दागिने जप्त
आरोपींकडून ३ लाख ९ हजार रुपये किमतीचा २३.१० ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस तसेच ९१ हजार रुपये किमतीचे ९.६४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले असा एकूण ४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पथकाची उल्लेखनीय कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, पोहेकॉ गिरीश पाटील, किरण चौधरी, प्रमोद लांडवंजारी, विशाल कोळी, सुभाष साबळे आणि योगेश घुगे यांनी ही उत्कृष्ट कामगिरी बजावली.





