
वृद्धेची सोनपोत चोरणाऱ्या भामट्याला अटक ; एलसीबीची कारवाई
जळगाव: एमआयडीसी परिसरातील एका लॉन्समधील लग्नसोहळ्यात ८५ वर्षीय वृद्धेची २१ ग्रॅमची सोनपोत लांबवणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलिसांनी अटक केली.
ही घटना ६ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली होती.पुष्पा जगन्नाथ न्याती (वय ८५) लग्नसोहळ्यासाठी लॉन्समध्ये उपस्थित होत्या. यावेळी अनोळखी व्यक्तीने त्यांच्या रूममध्ये प्रवेश करत गळ्याला काहीतरी लागल्याचे सांगून त्यांची २१ ग्रॅम वजनाची सोनपोत चोरली. याप्रकरणी पुष्पा यांचा मुलगा हेमंत न्याती यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला.
एलसीबीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना संशयित अनिल विजय हरताडे (रा. लक्ष्मी नगर, गेंदालाल मिल) याने चोरी केल्याची माहिती मिळाली. बुधवारी (१४ मे २०२५) त्याला ताब्यात घेतले असता चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. संशयिताला एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, अतुल वंजारी, हेड कॉन्स्टेबल अक्रम शेख आणि बाबासाहेब पाटील यांनी केली. तपास सहाय्यक फौजदार दत्तात्रय बडगुजर करत आहेत.