
जळगाव (प्रतिनिधी) – शहरात वाढत्या प्राणी चोरीच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त असताना, स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत तीन सराईत चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेली बकरी, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे बकरी चोरीच्या प्रकरणांना आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सय्यद परवेज सय्यद आसिफ (वय २६, रा. दत्त मंदिर जवळ, शनिपेठ) यांनी ९ सप्टेंबर रोजी शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, २७ ऑगस्ट रोजी त्यांच्या राहत्या घरासमोरून ७,००० रुपयांचा बोकड आणि त्यांच्या शेजारील आवेश शेख यांची ६,००० रुपयांची बकरी अज्ञात व्यक्तींनी चोरली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी तपास पथक तयार केले. पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या पथकाने तांत्रिक माहिती आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला. त्यांनी सापळा रचून तीन संशयितांना ताब्यात घेतले.
पोलीसी चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींची नावे गणेश वासुदेव जाधव (वय-२०), गणेश अशोक पाटील (वय-२१) आणि अक्षय विजय वंजारी (वय-२३) (सर्व रा. चिंचोली, ता. जळगाव) अशी आहेत. त्यांनी फक्त शनिपेठच नव्हे तर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतूनही तीन बकऱ्या चोरल्याचे कबूल केले.
पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेली बकरी, ती विकून मिळालेली रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटरसायकली जप्त केल्या आहेत. ही कारवाई यशस्वी करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्यासह सहा. फौजदार अतुल वंजारी, प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, विजय पाटील, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, किशोर पाटील, रतनहरी गिते, सिद्धेश्वर डापकर, प्रदीप चवरे आणि रवींद्र कापडणे यांनी परिश्रम घेतले.
पुढील तपास करण्यासाठी अटक केलेल्या आरोपींना शनिपेठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.





