गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी जळगावात विशेष कार्यशाळा
न्यायाधीश, सरकारी वकील आणि पोलीस अधिकाऱ्यांचे संयुक्त मार्गदर्शन; तपासातील त्रुटी दूर करण्यावर भर

गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी जळगावात विशेष कार्यशाळा
न्यायाधीश, सरकारी वकील आणि पोलीस अधिकाऱ्यांचे संयुक्त मार्गदर्शन; तपासातील त्रुटी दूर करण्यावर भर
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यात गुन्ह्यांच्या तपासातील त्रुटी दूर करून आरोपींना न्यायालयाकडून शिक्षा होण्याचे प्रमाण वाढविणे, दोषारोपपत्र अधिक सक्षम करणे आणि पोलीस व अभियोजन यंत्रणेमधील समन्वय बळकट करण्याच्या उद्देशाने जळगाव पोलीस दलातर्फे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या संकल्पनेतून आयोजित ही महत्त्वपूर्ण कार्यशाळा आज जळगाव विद्यापीठाच्या सभागृहात सकाळी ८ ते ११ या वेळेत पार पडली.
या कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून पीडीजे आर. एन. जोशी, सेशन जज एम. एस. बडे, एस. व्ही. खोंगल, एम. जी. चव्हाण, के. के. चाफळे, डीजीपी काब्रा, चोरडिया तसेच प्रॉसिक्यूशन अॅडिशनल डायरेक्टर श्रीमती ढगे उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी, एसडीपीओ, दुय्यम अधिकारी आणि सुमारे १०० अंमलदारांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला.
अचूक तपास आणि भक्कम पुराव्यांवर विशेष भर
गुन्ह्यांच्या तपासादरम्यान राहून जाणाऱ्या किरकोळ त्रुटी, कागदपत्रांमधील तांत्रिक उणिवा किंवा वैज्ञानिक व परिस्थितीजन्य पुराव्यांचा अभाव यामुळे अनेकदा आरोपी न्यायालयातून निर्दोष सुटतात. ही बाब लक्षात घेऊन तपास अधिक शास्त्रोक्त आणि कायदेशीरदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.
पुरावे संकलनाची योग्य पद्धत, दोषारोपपत्र निर्दोषपणे सादर करण्याची प्रक्रिया, न्यायालयीन कामकाजातील आवश्यक बाबी तसेच तपास अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक कायदेशीर बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
न्यायाधीश आणि सरकारी वकिलांचे थेट मार्गदर्शन
कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्यक्ष न्यायदान प्रक्रिया हाताळणारे न्यायाधीश आणि सरकारी वकील यांनी पोलीस अधिकाऱ्यांना थेट मार्गदर्शन केले. न्यायालयात कोणत्या प्रकारच्या पुराव्यांना अधिक महत्त्व दिले जाते, साक्ष नोंदविताना कोणती खबरदारी आवश्यक असते तसेच अभियोजन प्रक्रियेत पोलिसांची भूमिका किती महत्त्वाची असते, याबाबत सखोल माहिती देण्यात आली.
प्रत्यक्ष न्यायालयीन अनुभवातून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे उपस्थित अधिकाऱ्यांना तपास प्रक्रियेतील अनेक महत्त्वाच्या बाबी अधिक स्पष्ट झाल्याचे सांगण्यात आले.
गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळवून देण्याचा निर्धार
“पीडितांना वेळेत आणि योग्य न्याय मिळवून देणे हेच पोलीस दलाचे मुख्य कर्तव्य आहे. केवळ गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करणे एवढ्यावर पोलिसांची जबाबदारी संपत नाही. गोळा केलेले पुरावे न्यायालयात टिकतील आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळेल, यासाठी पोलीस आणि अभियोजन यंत्रणेतील समन्वय अत्यंत आवश्यक आहे,” असे मत पोलीस प्रशासनातर्फे व्यक्त करण्यात आले.
या अभ्यासपूर्ण कार्यशाळेमुळे आगामी काळात जळगाव जिल्ह्यातील तपास पद्धतीत गुणात्मक सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. गुन्ह्यांच्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने पुरावे संकलित करणे, तपासातील मानवी चुका कमी करणे तसेच सरकारी वकील आणि तपासी अधिकारी यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करणे यामुळे जिल्ह्यातील ‘कॉन्व्हिक्शन रेट’ अर्थात शिक्षा होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.




