जळगांव

वाघूर वीजवाहिनीच्या दुरुस्तीमुळे जळगावचा पाणीपुरवठा एक दिवस लांबणीवर

वाघूर वीजवाहिनीच्या दुरुस्तीमुळे जळगावचा पाणीपुरवठा एक दिवस लांबणीवर

४ जुलैला ७ तासांचा शटडाऊन; मनपाकडून पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल

प्रतिनिधी | जळगाव

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाघूर धरण परिसरातील पंपिंग स्टेशनला वीजपुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही उच्चदाब वीजवाहिनीच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी महावितरणकडून शुक्रवार, ४ जुलै रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सात तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे वाघूर पंपिंग स्टेशनवरील पाणीउपसा बंद राहणार असून जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे.

वाघूर धरण परिसरातील पंपिंग स्टेशन आणि उमाळा जलशुद्धीकरण केंद्राचे कामकाज सुरळीत राहावे यासाठी एमआयडीसी परिसरातून वाघूरपर्यंत सुमारे २८ किलोमीटर लांबीची ३३ केव्ही उच्चदाब वीजवाहिनी टाकण्यात आली आहे. आगामी पावसाळा लक्षात घेऊन या वाहिनीची आवश्यक देखभाल आणि दुरुस्ती करण्यात येत आहे.

पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल

महावितरणच्या शटडाऊनमुळे ४ जुलै रोजी वाघूरवरून शहराला पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. त्यामुळे संपूर्ण पाणीपुरवठा व्यवस्था विस्कळीत होऊ नये म्हणून जळगाव महानगरपालिकेने वेळापत्रकात एक दिवसाचा बदल केला आहे.

  • ज्या भागांना ४ जुलै रोजी पाणीपुरवठा होणार होता, त्या भागांना आता ५ जुलै रोजी पाणी मिळेल.
  • ज्या भागांना ५ जुलै रोजी पाणीपुरवठा नियोजित होता, त्या भागांना आता ६ जुलै रोजी पाणीपुरवठा करण्यात येईल.

महानगरपालिकेने नागरिकांनी या बदलाची नोंद घेऊन पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button