
नशिराबाद पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई; अवैध गोवंश कत्तल प्रकरणी ९ आरोपी जेरबंद
तब्बल १२.२० लाखांचा मुद्देमाल जप्त; गायी, बैल, वासरे आणि २०० किलो मांस हस्तगत, जिल्ह्यात खळबळ
जळगाव | प्रतिनिधी नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गोवंश कत्तल प्रकरणी पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई करत तब्बल ९ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईदरम्यान १२ लाख २० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, जिल्ह्यातील अवैध कत्तल व्यवसाय करणाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
२८ मे रोजी नशिराबाद पोलीस ठाण्याच्या प्रभारी महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे या आपल्या पथकासह नियमित पेट्रोलिंग करत असताना त्यांना फातेमा नगर परिसरात परवीन कुरेशी, मुक्तार कुरेशी आणि त्यांच्या साथीदारांकडून गोवंश जनावरांची अवैधरित्या कत्तल सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीचे गांभीर्य लक्षात घेत जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तातडीने छापा टाकण्याचे आदेश दिले.
यानंतर सपोनि योगिता नारखेडे यांनी पोलिसांच्या विशेष पथकासह मध्यरात्री संबंधित ठिकाणी अचानक धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी एकूण ९ आरोपींना जागीच पकडले. तसेच गोवंश जनावरांची कत्तल होण्यापूर्वीच ती रोखण्यात यश आले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून ३ गायी, १ बैल, ९ गोन्हे, २ लहान वासरे आणि सुमारे २०० किलो गोवंश सदृश्य मांस जप्त केले. याशिवाय मांस वाहतूक आणि विक्रीसाठी वापरण्यात येणारी वाहनेही ताब्यात घेण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या संपूर्ण मुद्देमालाची किंमत १२ लाख २० हजार ९०० रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाणे येथे संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हरेष पाटील करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक रविंद्र तायडे, पोलीस उपनिरीक्षक हरेष पाटील, सहाय्यक फौजदार शरद सोनार, सहाय्यक फौजदार राजेश मेंढे, पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील, गुणवंत देशमुख, प्रशांत विरणारे, कमलाकर बागुल तसेच पोलीस कॉन्स्टेबल भरत बाविस्कर, पंकज सोनवणे, विठ्ठल मुंढे, सागर बिडे, विजय अहिरे, भुषण पाटील आणि रामकृष्ण माळी यांनी सहभाग घेतला.




