
रात्रीच्या अंधारात पोलिसांचा धडाका; अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले!
जिल्हाभर विशेष मोहिमेत दारू, जुगार आणि टवाळखोरांवर कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त
जळगाव | प्रतिनिधी
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जळगाव पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री विशेष धडक मोहीम राबवत अवैध धंदे, जुगार अड्डे आणि सार्वजनिक ठिकाणी गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई केली. या मोहिमेत दारूबंदी कायद्यांतर्गत १२ गुन्हे दाखल करण्यात आले असून तब्बल ६ लाख ५२ हजार ८७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर एकाच वेळी राबविण्यात आलेल्या या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकत १०५ देशी दारूच्या बाटल्या, २८ विदेशी मद्याच्या बाटल्या, १५ बिअरच्या बाटल्या, ३१३ लिटर हातभट्टी दारू, ४ हजार ५०० लिटर कच्चे रसायन आणि १ हजार ६०० लिटर केमिकल जप्त केले.
याशिवाय जिल्ह्यात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर कारवाई करत दोन जुगार प्रकरणे उघडकीस आणण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना त्रास देणाऱ्या आणि विनाकारण गर्दी करून दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या व्यक्तींवरही पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले. त्यानुसार मुंबई पोलीस कायदा कलम ११२ व ११७ अंतर्गत १९ टवाळखोरांविरुद्ध कारवाई करण्यात आली.
तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या सात जणांविरुद्ध स्वतंत्र कारवाई करण्यात आली. या धडक मोहिमेमुळे जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले असून सर्वसामान्य नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले आहे.

जिल्ह्यात अवैध धंदे, गुन्हेगारी आणि असामाजिक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा पुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले.





