
मतदार यादीच्या कामात दिरंगाई; १३ कर्मचाऱ्यांविरुद्ध जळगाव शहर पोलिसांत गुन्हा
सरकारी आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई; लोकप्रतिनिधी अधिनियम आणि बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल
जळगाव | प्रतिनिधी
मतदार यादी विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत सोपविण्यात आलेली कामे वेळेत पूर्ण न करता सरकारी आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १३ कर्मचाऱ्यांविरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक विभागाकडून करण्यात आलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.
मतदार यादीच्या कामात आढळली दिरंगाई
मतदार यादीतील मॅपिंग, अस्पष्ट छायाचित्रांची दुरुस्ती तसेच डीएसई (DSE) संबंधित कामे पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली होती. मात्र १९ सप्टेंबर २०२५ पासून सुरू असलेल्या या प्रक्रियेत अद्यापही अनेक कामे अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले. यामुळे निवडणूक विभागाने याची गंभीर दखल घेतली.
तहसील कार्यालयाच्या तक्रारीवरून कारवाई
निवडणूक शाखेचे अधिकारी नवीनचंद्र अशोक भावसार (वय ५४, रा. कोल्हे नगर, जळगाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मतदार यादी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेत निष्काळजीपणा झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
१३ कर्मचाऱ्यांचा समावेश
या प्रकरणात अर्जुन काशीनाथ ठाकरे (प्रतिभा माध्यमिक विद्यालय), फारुक शहा हानिफ शहा (युनिक प्राथमिक उर्दू शाळा, मेहरूण), शुभम रमेश गजभिये (लिपिक, महापालिका), हितेंद्र विलास नेस (ला.ना. सार्वजनिक विद्यालय), विकास सुकलाल चव्हाण (पद्माबाई बारकू हायस्कूल), हुसेन सरदार तडवी (महापालिका उर्दू शाळा), मोहम्मद परवेज शेख हुसेन (महापालिका उर्दू शाळा), तुळशीराम भागवत भावसार (शारदा माध्यमिक विद्यालय), संजय गोपाळ चौधरी (महाराणा प्रताप शाळा), कोमल निलकंठ तायडे (तंत्रनिकेतन), कल्पेश गोपाल पवार (लिपिक, महापालिका), संजीव नामदार तडवी (मुंदडा शाळा) आणि कल्पेश यशवंत पाटील (लिपिक, जिल्हा परिषद) यांचा समावेश आहे.
लोकप्रतिनिधी अधिनियमांतर्गत गुन्हा
या प्रकरणी गुन्हा क्रमांक १६३/२०२६ नुसार लोकप्रतिनिधी अधिनियम १९५० चे कलम ३२ तसेच भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र ठाकरे करीत आहेत. वृत्त लिहीपर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती.





