इतर

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

जळगाव,  (प्रतिनिधी):‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (फाली) या उपक्रमाच्या माध्यमातून शेती आणि शेतीपूरक उद्योजक घडविण्याचे कार्य गेल्या बारा वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. या कालावधीत देशभरातील ५० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवून आधुनिक शेती, कृषी व्यवस्थापन, तंत्रज्ञानाचा वापर आणि कृषी उद्योजकतेचे प्रशिक्षण घेतले आहे. जैन इरिगेशनसह विविध सहकारी संस्थांच्या सहभागातून राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे आगामी काळात भारतीय कृषी क्षेत्रात सकारात्मक आणि दीर्घकालीन बदल घडून येतील, असा विश्वास जैन फार्म फ्रेशचे संचालक अथांग जैन यांनी जैन हिल्स येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
यावेळी फालीच्या उपाध्यक्ष नॅन्सी बेरी, गुड अँड ग्रीन सस्टेनेबिलिटी अँड सीएसआर, गोदरेजच्या पाकज्ञान दस्तूर, फालीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) शार्बोनी पोदार तसेच जनरल मॅनेजर रोहिणी घाडगे उपस्थित होत्या. त्यांनीही मनोगत व्यक्त केले. अथांग जैन म्हणाले की, बदलत्या कृषी परिस्थितीत तरुण पिढीला शेतीकडे आकर्षित करणे आणि त्यांना आधुनिक तंत्रज्ञान, बाजारपेठेचे ज्ञान तसेच शाश्वत शेतीच्या पद्धतींचे प्रशिक्षण देणे ही काळाची गरज आहे. फालीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, नवोन्मेषी विचारसरणी आणि कृषी उद्योजकतेची जाणीव विकसित होत आहे. यामुळे भविष्यात सक्षम कृषी नेतृत्व निर्माण होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्यास मदत होईल.
फाली कार्यक्रमाचा विस्तार आता तीन राज्यांमध्ये करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षण दिले जात आहे. या उपक्रमातून तयार होणारे युवा कृषी नेते आधुनिक, शाश्वत शेती आणि उद्योगाच्या दिशेने देशाच्या कृषी क्षेत्राला नवी दिशा देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या उपक्रमास जैन इरिगेशन सह गोदरेज अॅग्रोवेट, युपीएल, स्टार अॅग्री, रॅलीज इंडिया, ओमनिवोअर, प्रॉम्पट, एसबीआय फाउंडेशन, अमूल आणि उज्जीवन या कंपन्यांचे सहकार्य लाभते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button