कारच्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात शोककळा

कारच्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात शोककळा
वरणगाव (प्रतिनिधी):
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात वरणगावजवळ एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना घडली आहे. एका भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एका महिलेसह एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडला. या घटनेमुळे संपूर्ण वरणगाव आणि मलकापूर परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत असून, निष्पाप जीवांच्या मृत्यूमुळे मृतांच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त करत न्यायाची मागणी केली आहे.
लस्सी पिण्यासाठी जात असताना काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे मलकापूर येथील रहिवासी असलेले फासे पारधी समाजातील एक कुटुंब गेल्या दोन-तीन महिन्यांपासून वरणगाव परिसरातील कपीलनगर येथे पत्र्याच्या घरात वास्तव्यास होते.
शुक्रवारी दुपारी कडाक्याच्या उन्हामुळे जय शंकर काळे (वय १९) हा आपली मामी ऐश्वर्या बहाद्दूर भोसले (वय ३०) आणि दोन लहान मुले विघ्नेश शंकर चव्हाण (वय १४) व अवघ्या एका वर्षाची चिमुरडी मोनालिसा शिवबसप्पा भोसले यांना सोबत घेऊन दुचाकीवरून वरणगाव येथे लस्सी पिण्यासाठी निघाला होता. सर्वजण आनंदाने जात असतानाच, वरणगावच्या पुढे एका अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील चौघेही रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली.
जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश
अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत अपघातग्रस्त दुचाकी ओळखली आणि कपीलनगर येथे राहणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या चौघांनाही तातडीने उपचारार्थ जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती चौघांनाही ‘मृत’ घोषित केले.
एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा, त्यातही दोन अल्पवयीन मुलांचा अचानक अपघातात मृत्यू झाल्याचे समजताच जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. त्यांच्या क्रंदनाने संपूर्ण रुग्णालय परिसर हेलावून गेला होता.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची रुग्णालयात धाव
घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांनी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी मृतकांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली व या कठीण प्रसंगात त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, अपघात घडवून पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा आणि त्याच्या चालकाचा पोलीस कसून शोध घेत आहेत. याप्रकरणी वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत. एकाच घरातील चार जण अपघातात दगावल्याने परिसरात सर्वत्र शोककळा पसरली आहे.





