इतर

जळगाव पोलिसांचे “ऑपरेशन ऑल आऊट”; एका दिवसात २,३०० हून अधिक कारवाया

जळगाव पोलिसांचे “ऑपरेशन ऑल आऊट”; एका दिवसात २,३०० हून अधिक कारवाया
दारूबंदी, जुगार, वाहतूक नियमभंग आणि फरार आरोपींविरोधात धडक मोहीम

जळगाव | प्रतिनिधी

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने जळगाव पोलिसांनी ५ जून रोजी “ऑपरेशन ऑल आऊट” ही विशेष मोहीम राबवून विविध प्रकारच्या गुन्हेगारी व बेकायदेशीर कृत्यांविरोधात व्यापक कारवाई केली. या मोहिमेदरम्यान दारूबंदी, जुगार, अमली पदार्थ, वाहतूक नियमभंग, अवैध वाळू वाहतूक तसेच फरार आरोपींविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली.

मोहीमेदरम्यान दारूबंदी कायद्यांतर्गत १९६ गुन्हे दाखल करण्यात आले असून सुमारे २१ लाख ६५ हजार ६७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांविरुद्ध ५६ गुन्हे नोंदविण्यात आले. जुगाराच्या ७६ प्रकरणांमध्ये कारवाई करून ४६ हजार ३९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

शस्त्र अधिनियमाच्या कलम ३/२५ व ४/२५ अंतर्गत ४ गुन्हे दाखल करण्यात आले, तर अमली पदार्थ सेवन प्रकरणी (एनडीपीएस) १० जणांवर कारवाई करण्यात आली. तंबाखूजन्य पदार्थांवरील नियंत्रणासाठी कोटपा (COTPA) कायद्यांतर्गत तब्बल २०३ गुन्हे नोंदविण्यात आले.

सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण कामगिरी करताना पोलिसांनी मोहिमेदरम्यान ३४ बेपत्ता महिलांचा शोध लावून त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.

भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८५ अंतर्गत २२, कलम १२६ अंतर्गत २०१, कलम १२२/१२४ अंतर्गत ५ तसेच कलम १२९ अंतर्गत १७ गुन्हे नोंदविण्यात आले.

वाहतूक शाखेनेही मोठ्या प्रमाणावर कारवाई करत मोटार वाहन कायद्याअंतर्गत १,४४३ कारवाया केल्या. यामधून ९ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्या ३७ चालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम १४२ अंतर्गत ५ प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली.

मोहीमेदरम्यान जिल्हाभरातील २०८ हॉटेल्सची तपासणी करण्यात आली. तसेच न्यायालयीन प्रक्रियेतील ४२ अटक वॉरंट (NBW) आणि ५२ जामीनपात्र वॉरंट (BW) बजावण्यात आले. अवैध वाळू वाहतुकीच्या ६ प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली असून २ फरार व वॉंटेड आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले.

जळगाव पोलिसांनी राबविलेल्या या विशेष मोहिमेमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तींवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. पोलीस प्रशासनाकडून अशा विशेष मोहिमा यापुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button