अपघातगुन्हेजळगांव

अमळनेरात दुचाकी नाल्यात कोसळून मारवड पोलीस ठाण्यातील हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू

अमळनेरात दुचाकी नाल्यात कोसळून मारवड पोलीस ठाण्यातील हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू

​अमळनेर (विशेष प्रतिनिधी): मारवड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका ४४ वर्षीय पोलीस हवालदाराचा दुचाकी स्लिप होऊन नाल्यात पडल्याने आणि पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. भरत एकनाथ गायकवाड (वय ४४, रा. अंबाळा ता. चोपडा, ह.मु. अंजनी बिल्डिंग, रूम नं. ०१, पोलीस लाईन, ढेकू रोड, अमळनेर) असे मृत पोलीस अंमलदाराचे नाव आहे. ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७:०० वाजेच्या सुमारास पिंपळे रोडवरील ८० फुटी रस्त्याशेजारील नाल्यात ही घटना उघडकीस आली.

​मिळालेल्या माहितीनुसार, ९ ऑगस्ट रोजी सकाळी अमळनेर पोलीस ठाण्याच्या गांधलीपुरा पोलीस चौकी हद्दीतील पिंपळे रोडवर ८० फुटी रस्ता संपतो त्या ठिकाणी नाल्यात एक इसम दुचाकीसह पडलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने नाल्यातून हिरो होंडा स्प्लेंडर (क्रमांक MH-19-AZ-3841) आणि इसमाचा मृतदेह बाहेर काढला.

​तपासणी केली असता मृत व्यक्ती मारवड पोलीस ठाणे (ता. अमळनेर) येथे नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार भरत एकनाथ गायकवाड असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या डोक्याला आणि कानाला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाला होता. तसेच दुचाकीच्या डिक्कीत सरकारी गणवेश आढळून आला.

​त्यांची दुचाकी घसरून नाल्यात पडल्याने डोक्याला मार लागून पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृतदेह खाजगी रुग्णवाहिकेने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

​या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
​, पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड प्रकरणाचा पुढील  तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button