
घरात घुसून गावठी कट्ट्याचा धाक; रेकॉर्डवरील तिघांना अटक
जळगाव : जुन्या वादातून एका तरुणाच्या घरात घुसून त्याच्या आईला धमकावत दहशत निर्माण करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपींवर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत अटक केली असून, त्यापैकी एका आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे.
२ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १.३० वाजता लक्ष्मीनगर परिसरातील आकाश अजय सोनार (वय २६) यांच्या घरात आरोपी रोशन उर्फ बबलू हिरामन मनोरे, अविनाश रामेश्वर राठोड, गणेश भास्कर दंडगव्हाळ, जिगर बोंडारे तसेच इतर तीन अनोळखी इसम घुसले. यावेळी बबलू धनगर याच्या हातात कोयता असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
आरोपींनी आकाशच्या आईला, “तुझा मुलगा आकाश कुठे आहे, त्याचा आज मर्डर करतो,” अशी धमकी देत शिवीगाळ केली. आकाश घरात न मिळाल्याने आरोपींनी घरावर दगडफेक केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६३९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह आर्म्स ॲक्ट कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हे शोध पथकाने १२ ऑगस्ट रोजी रोशन उर्फ बबलू हिरामन मनोरे (२५), गणेश भास्कर दंडगव्हाळ (२७) आणि अविनाश रामेश्वर राठोड (२७) यांना ताब्यात घेतले. चौकशीत गणेश दंडगव्हाळ याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला एक गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला.
तिन्ही आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश चौधरी करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल नितीन ठाकूर, किरण पाटील, गणेश ठाकरे व राहुल घेटे यांच्या पथकाने केली




