
अकलूद येथे कुंटणखान्यावर धाड
चार महिलांची सुटका, संशयित महिलेवर कारवाई
फैजपूर: फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अकलूद गावाच्या शिवारात तापी नदीकाठी असलेल्या एका दुमजली घरात सुरू असलेल्या संशयित कुंटणखान्यावर पोलिसांनी गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास अचानक छापा टाकला. या धडक कारवाईत पोलिसांनी चार पीडित महिलांची सुटका केली असून, बेकायदेशीररीत्या वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अकलूद येथील मनीषा प्रकाश झोपे (वय ४५) ही महिला या दुमजली घरात वेश्याव्यवसाय चालवत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार फैजपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर उपविभाग, यावल व निंभोरा पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने नियोजनबद्ध योजना आखली. पोलिसांनी प्रथम एक पंटर पाठवून माहितीची खात्री केली आणि त्यानंतर तात्काळ घरावर छापा टाकला.
या छाप्यादरम्यान दुमजली घराची पाहणी केली असता, त्यात वेश्याव्यवसाय चालवण्यासाठी अनेक लहान-मोठ्या खोल्यांची विशिष्ट रचना करण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. सुटका करण्यात आलेल्या चार महिलांपैकी तीन महिला मूळच्या पश्चिम बंगालमधील असून त्या सध्या भुसावळ येथे वास्तव्यास होत्या, तर चौथी महिला भुसावळ येथीलच आहे. या प्रकरणी कुंटणखाना चालवणाऱ्या मनीषा झोपेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली असून फैजपूर पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.





